स्मशानभूमीत पार्थिवांच्या वेदना कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:57 PM2018-07-27T23:57:53+5:302018-07-28T00:00:17+5:30

कठाणी नदी घाटावर नगर परिषदेने अंत्यविधीसाठी दोन प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तब्बल एक वर्षानंतर बोअर खोदली.

In the crematorium, the pain of the patient continued | स्मशानभूमीत पार्थिवांच्या वेदना कायम

स्मशानभूमीत पार्थिवांच्या वेदना कायम

Next
ठळक मुद्देआता वीजेची प्रतीक्षा : ५० हजार रुपयांच्या मंजुरीसाठी दीड वर्षाचा कालावधी
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कठाणी नदी घाटावर नगर परिषदेने अंत्यविधीसाठी दोन प्रशस्त इमारती बांधल्या आहेत. इमारतींचे बांधकाम होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तब्बल एक वर्षानंतर बोअर खोदली. आता वीज नसल्याने बोअर मधून पाणी काढणे शक्य नाही. त्यामुळे स्मशानभूमी असूनही पावसात उघड्यावर दहनसंस्कार करावा लागत आहे. अजून किती दिवस हे सहन करायचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
गडचिरोली शहरातील बहुतांश अंत्यविधी कठाणी नदीच्या पात्रात पार पाडले जातात. अंत्यविधीनंतर जमा झालेली राख नदीच्या पाण्यात ढकलली जाते. त्याचबरोबर वापरली जाणारी पूजेची व इतर सामग्री नदीच्या पाण्यातच सोडली जाते. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. पावसाळ्यात नदीत पाणी राहत असल्याने अंत्यविधी नदीकाठावरच आटोपावे लागत होते. त्यातही दिवसभर पाऊस असल्यास मृतदेहाला अग्नी देण्यास अडचण येत होती.
या सर्व अडचणी लक्षात घेऊन नगर परिषदेने स्थानिक विकास निधीतून अंत्यविधी पार पाडण्यासाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. यावर लाखो रूपये खर्च झाले. इमारतींचे बांधकाम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले. मात्र या ठिकाणी बोअरवेल व वीज व्यवस्था नसल्याचे कारण पुढे करून लोकार्पण थांबविण्यात आले. तब्बल एक वर्षांनतर म्हणजेच एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला या ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आली. बोअरवेलमध्ये पाणीपंपही टाकला आहे. बोअरवेल मधील पाणी बाहेर काढण्यासाठी वीज आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यत वीज जोडणी करणे नगर परिषदेला शक्य झाले नाही.
मागील एक महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात अडचणी निर्माण होत आहे. अगदी पाण्याजवळ पार्र्थिवावर अंतिम संस्कार करावे लागत आहेत. लाखो रूपयांची इमारत मात्र केवळ वीज नसल्यामुळे निरूपयोगी ठरत आहे.
वीज जोडणी करण्यासाठी जास्तीत जास्त ५० ते ६० हजार रूपयांचा खर्च येणार आहे. एवढा निधी नगर परिषदेच्या सामान्य फंडातून खर्च करणे सहज शक्य असताना त्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बोअरवेल खोदण्यासाठी एक वर्ष लागले आता वीज पुरवठा करण्यासाठी किती दिवस लागेल, असा प्रश्न केला जात आहे.

राखेच्या विल्हेवाटीसाठी पाणी आवश्यक
चिता रचण्यासाठी लोखंडी कठडे तयार करण्यात आले आहेत. लोखंडी जाळ्यांवर लाकडे व पार्थीव ठेवले जाते. जळाल्यानंतर राख जमा होण्यासाठी खाली खड्डा तयार करण्यात आला आहे. या खड्डयाला छिद्र ठेवण्यात आले आहे. या छिद्रातून पुढे पाटाद्वारे राख नदीत जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तयार केलेल्या नालीद्धारे राख नदीत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते त्यामुळे स्मशानभूूमीसाठी बोअरवेल व वीज आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत वीज व पाण्याची व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी अंत्यविधी करणे अशक्य होणार आहे.

इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करतानाच त्यात बोअरवेल व विजेच्या सुविधेचा समावेश असणे आवश्यक होते. मात्र यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केवळ इमारत बांधली. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपण पुढाकार घेऊन स्मशानभूमीत बोअरवेल खोदली आहे. वीज जोडणीचे काम बाकी आहे. १५ आॅगस्टच्या पूर्वी या ठिकाणी वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद प्रयत्नरत आहे. नागरिकांना वन विभागाच्या डेपोतून लाकडे न्यावी लागतात. स्मशानभूमी परिसरात एक इमारत आहे. या इमारतीत लाकूड ठेवण्याची व्यवस्थाही केली जाईल. लाकडे खरेदी विक्रीचे काम एखाद्या खासगी यंत्रणेकडे सोपविले जाईल.
- योगीता पिपरे, अध्यक्ष
नगर परिषद गडचिरोली

Web Title: In the crematorium, the pain of the patient continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.