‘त्या’ अपघातातील मृतांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 01:19 AM2017-06-15T01:19:40+5:302017-06-15T01:19:40+5:30

गेल्या बुधवारी (दि.७) सिरोंचाकडून आलापल्लीकडे येणारी भरधाव कार झाडावर आदळल्याने कारमधील दोघे जण ठार तर तिघे जण जखमी झाले होते.

Crime on the death of 'those' accidents | ‘त्या’ अपघातातील मृतांवर गुन्हा

‘त्या’ अपघातातील मृतांवर गुन्हा

Next

खरा चालक दुसराच? : बालकाचे बयाण घेतलेच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या बुधवारी (दि.७) सिरोंचाकडून आलापल्लीकडे येणारी भरधाव कार झाडावर आदळल्याने कारमधील दोघे जण ठार तर तिघे जण जखमी झाले होते. या अपघात खऱ्या गाडीचालकाला सोडून मागील सीटवर बसलेल्या मृतक हेमंत उमरे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप उमरे यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे या घटनेतील साक्षीदार असलेल्या १३ वर्षीय बालकाचे बयाण अद्याप बाकी आहे. तरीही पोलिसांनी चालक कोण होता हे निश्चित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा अपघात आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील छल्लेवाडा वळणानजीक बुधवारी घडला होता. या अपघातात ठार झालेल्यांमध्ये वेकोलिचे क्रीडा प्रशिक्षक हेमंत उमरे (४०) रा.बल्लारपूर व त्यांचे काका अमरनाथ उमरे (५९) रा.बल्लारपूर जि.चंद्रपूर यांचा समावेश आहे. हे दोघेही मागील सीटवर बसलेले असल्याचे अपघाताच्या छायाचित्रांवरून स्पष्ट होते. याशिवाय किशोर इशांत ठेगारत (५६) रा.घुग्गुस, बलदेव सिंग (५७) रा.घुग्गुस या कर्मचाऱ्यांसह हर्ष हेमंत उमरे (१३) रा.बल्लारपूर हा बालकही जखमी झाला आहे. एअर बॅगमुळे चालकाला कमी मार लागला.
जखमींवर उपचार सुरू असल्यामुळे सर्वांचे बयाण घेतल्यानंतरच गाडीचालक कोण हे ठरवून त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल, असे राजाराम उपपोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक लावणे यांनी सांगितले होते. त्यानंतर राहिलेल्या जखमींचे बयाण घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या बयाणात मृतक हेमंत उमरे हे गाडी चालवित असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र बालक हर्ष उमरे याचे बयाण होण्याची वाट न पाहता गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे या प्रकरणात वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांनी सत्यता पडताळून पाहिली जाईल असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Crime on the death of 'those' accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.