विहीरगावात सात दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:41+5:302021-03-06T04:34:41+5:30
देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव येथील सात दारू विक्रेत्यांच्या घरी धाडी टाकून एक क्विंटल मोहसडवा नष्ट व नवी शक्कल लढवीत फिल्मी ...
देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव येथील सात दारू विक्रेत्यांच्या घरी धाडी टाकून एक क्विंटल मोहसडवा नष्ट व नवी शक्कल लढवीत फिल्मी स्टाइलने लपवून ठेवलेली २५ हजार रुपये किमतीची तीन पेटी देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी देसाईगंज पोलीस ठाण्यात सात दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई देसाईगंज पोलीस, मुक्तिपथ व गाव संघटनेने संयुक्तरीत्या केली आहे.
विहीरगाव येथे गाव संघटनेच्या प्रयत्नामुळे अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, गावातील काही दारूविक्रेत्यांनी न जुमानता दारूविक्री सुरू केली. परिणामी गावातील कायदा व शांतता भंग झाली होती. याबाबतची माहिती प्राप्त होताच देसाईगंज पोलीस, गाव संघटन व मुक्तिपथने संयुक्त कारवाई करीत दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी अहिंसक कृतीचे नियोजन केले. त्यानुसार गावातील सात दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान एकूण १ क्विंटल मोहसडवा नष्ट करण्यात आला. दारूविक्रेत्यांनी नवी शक्कल लढवीत फिल्मी स्टाइलने लपवून ठेवलेली २५ हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकाच दिवशी गावातील सात दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई पोलीस अधिकारी बावनकर, पोलीस कर्मचारी, मुक्तिपथ तालुका चमूने केली आहे.