गर्भपातास बाध्य करणाऱ्या तिघांवर गुन्हे
By admin | Published: June 8, 2017 01:40 AM2017-06-08T01:40:30+5:302017-06-08T01:40:30+5:30
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार करणाऱ्या एका युवकास तसेच अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार करणाऱ्या एका युवकास तसेच अवैधरित्या गर्भपात करण्यासाठी युवकाला सहकार्य करणाऱ्या अन्य दोघांवर पुराडा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणातील आरोपींची नावे सचिन नैताम, गणपत उसेंडी व कैलास मडावी अशी आहेत.
पीडित युवतीने पुराडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, दीड महिन्यापूर्वी म्हणजे २१ एप्रिल २०१७ रोजी युवतीचे लग्न चिनेगाव येथील एका युवकाशी रितीरिवाजानुसार झाले. तेव्हापासून पती-पत्नी चिनेगाव येथे एकत्र वास्तव्य करीत होते. परंतु २८ मे रोजी नवविवाहित महिलेच्या पोटात दुखू लागले. त्यानंतर ती आपल्या पत्नीसह कढोली येथील एका खासगी दवाखान्यात तपासणीकरिता गेली. दरम्यान डॉक्टरांनी तिला पाच महिन्याची गर्भवती असल्याचे सांगून तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला व तिला घरी परत पाठविले. लग्नास केवळ दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना पत्नी पाच महिन्याची गर्भवती कशी, असा प्रश्न पतीसमोर उपस्थित झाला. पतीला राग आल्याने त्याच दिवशी आपल्या पत्नीला तिच्या माहेरी जामटोला येथे सोडून दिले व पत्नी आपल्या स्वगावी परतला.
त्यानंतर पीडित युवतीने ती गर्भवती राहण्यास दोषी असलेल्या युवकाचे नाव आपल्या कुटुंबियांना सांगितले. सचिन मय्याराम नैताम हा युवक तिला मेहुणा लागत होता. त्यामुळे तो तिच्या घरी तो नेहमी यायचा. दरम्यानच्या काळात आम्हा दोघांचे प्रेम जुळले. यानंतर सचिनने मला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. यातून मी गर्भवती राहिली. परंतु त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे मी एका महिलेच्या घरी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी बैठक बोलावून गर्भधारणेस दोषी युवकाचे मला नाव विचारले व त्याच्या घरी जाण्यास सांगितले. गावकऱ्यांना मी सचिन नैताम याचे नाव सांगून त्याच्या घरी राहण्यास गेली. परंतु सचिन घरी नसल्याने त्याच्या बहिनीने घरी राहण्यास मज्जाव करून मला तिथून हाकलून दिले. त्यामुळे मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित करणारा सचिन नैताम तसेच वारवी येथे एका महिलेकडे नेऊन बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या गणपत उसेंडी व कैलास मडावी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पीडित युवतीने केली.
‘त्या’ महिलेचा शोध सुरू
पुराडा पोलिसांनी आरोपी युवक सचिन नैताम याचेवर भादंविचे कलम ३७६ व गर्भपातास सहकार्य करणारे गणपत उसेंडी व कैलास मडावी यांचेवर भादंविचे कलम ३१३, ३१५, ३१६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुराडा पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतले असून अवैध गर्भपात करणाऱ्या महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास प्रभारी पोलीस अधिकारी व्ही. एस. गुशींगे करीत आहेत.