बोडी फुटल्याने पीक वाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:52 PM2018-08-19T23:52:46+5:302018-08-19T23:53:16+5:30
भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड तालुक्यात गुरूवारपासून सतत दमदार पाऊस होत असल्याने तलाव, बोड्यातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील दुडेपल्ली येथील एका शेतकऱ्याची खासगी बोडी फुटल्याने परिसरातील धानपीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामुळे २५ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक शेतातील बांध्यांचे पाळे फुटून धान पिकाचे नुकसान झाले. लहान-मोठ्या बोड्यांमध्ये पाणीसाठा वाढल्याने काही ठिकाणच्या बोड्या फुटल्या. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या दुडेपल्ली येथील शेतकरी काटा जोरना मट्टामी यांच्या शेतात मोठा तलाव आहे. तीन-चार दिवस झालेल्या दमदार पावसाने या तलावाची पाळ शुक्रवारी फुटली. त्यामुळे तलावाखालील शेतजमिनीतील धानपीक वाहून गेले. यामुळे २५ शेतकºयांचे नुकसान झाले. आता शेतात रेती जमा झाली आहे. सदर तलावात मट्टामी यांनी १० हजार रूपये किमतीचे ८ ते ९ किलो मत्स्य बीज टाकले होते. मात्र तलावाची पाळ फुटल्याने सर्व मत्स्य बीज वाहून गेले. मत्स्य पालन व्यवसायातून दरवर्षी मट्टामी यांना ३० ते ४० हजार रूपये उत्पन्न मिळत होते, अशी माहिती गावातील प्रतिष्ठीत नागरिक देजू पुंगाटी यांनी लोकमत प्रतिनिधींना सांगितले. तलाव फुटल्याने शेतकरी मट्टामी यांचे सर्वाधिक नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त सर्वच २५ शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार
दुडेपल्ली येथील बोळीची पाळ फुटून धान पिकाची नुकसान झाल्याबाबतची माहिती कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वत: कार्यालयातून येऊन दिली नाही. संततधार पाऊस असल्यामुळे कुठेही जाता येत नाही. तालुक्यातील सर्व नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज बांधून सर्व तलाठी व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुडेपल्ली गावासह तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार, अशी माहिती तहसीलदार कैलास अंडील यांनी लोकमतशी बोलताना दिली.