मेडिगड्डामुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:28 AM2018-07-27T00:28:20+5:302018-07-27T00:29:43+5:30
सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांची जवळपास १०० एकर जमीन मेडिगड्डा प्रकल्पाच्या शेजारी आहे. प्रकल्पावर साहित्य नेण्यासाठी एल अॅण्ड टी कंपनीकडून रस्ता तयार केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांची जवळपास १०० एकर जमीन मेडिगड्डा प्रकल्पाच्या शेजारी आहे. प्रकल्पावर साहित्य नेण्यासाठी एल अॅण्ड टी कंपनीकडून रस्ता तयार केला जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
रस्ता तयार होत असल्याने नुकसानभरपाई देण्याबाबत पोचमपल्ली येथील शेतकऱ्यांनी सिरोंचाचे तहसीलदार यांना निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली. तहसीलदारांनी गावात सभा घेऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. मात्र कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत संबंधित शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. समस्येबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली. याबाबीकडे स्वत: लक्ष घालून समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिले. सिरोंचा तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष सिरोंचा तालुक्याला आपण भेट देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जमिनीचे नुकसानभरपाई न दिल्यास कंपनीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व वित्त सभापती भाग्यश्री आत्राम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य ज्ञानकुमारी कौशी, युद्धिष्टीर बिश्वास, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, ऋषीकांत पापडकर, मधुकर कोल्लुरी, धर्मराज वडलाकोंडा यांच्यासह सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी हजर होते.
मेडिगड्डा सिंचन प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील काही शेतकऱ्यांची जमीन जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. या सिंचन प्रकल्पाचा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणताच फायदा नाही. तरीही शेतकरी जमीन देण्यासाठी तयार झाले. यानंतरही अनेक अडचणी निर्माण केल्या जात असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.