२३१ सिंचन विहिरींच्या अनुदानाचे कोट्यवधी रुपये प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:36 AM2021-03-10T04:36:36+5:302021-03-10T04:36:36+5:30
शासनाने सिंचन विहिरींचे प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा कुरखेडा पंचायत समितीचे ...
शासनाने सिंचन विहिरींचे प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा कुरखेडा पंचायत समितीचे माजी सदस्य चांगदेव फाये यांनी केली आहे. नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या जिल्ह्यांत भूगर्भात पाण्याची अधिक उपलब्धता असूनही विहिरींची संख्या कमी असल्याने सिंचनाची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने उपलब्ध पाण्याची पातळी लक्षात घेता सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम सुरू करण्यात आला. या अंतर्गत सदर विहिरी मंजूर करण्यात आल्या असून कुरखेडा तालुक्यातील १५१ पैकी ५१ विहिरींचे काम सुरू करण्यात आले, त्यापैकी २ पूर्ण झाल्या असून, काम सुरू विहिरींपैकी ४९ अपूर्ण आहेत, तर १०० विहिरींचे काम अद्यापही सुरू झाले नाही. कोरची तालुक्यात ८० विहिरी मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी कामे २० सुरू करण्यात आली. त्यापैकी जवळपास २० विहिरींचे काम पूर्ण झाले असून बोअर घेण्याचे काम बाकी असून ६० विहिरींचे काम सुरू झाले नाही. यापैकी काही लाभार्थींचे अर्धवट अनुदान दिले असून, बरेच लाभार्थ्यांचे करोडो रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. दिरंगाई होत असल्यामुळे लाभार्थी चिंतेत असून, संबंधित कार्यालयात वारंवार विचारणा करीत असून विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे अर्धवट काम झालेल्या व काम सुरू न झालेल्या कुरखेडा कोरची व जिल्ह्यातील सर्व लाभार्थींचे अनुदान त्वरित देण्यात यावे, जेणेकरून रखडलेले काम पूर्ण करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी केले आहे.