वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांची गर्दी
By Admin | Published: December 27, 2016 01:58 AM2016-12-27T01:58:03+5:302016-12-27T01:58:03+5:30
महावितरणच्या वतीने घरगुती, औद्योगिक, वाणिज्यीक थकबाकीदार ग्राहकांविरोधात वीज पुरवठा खंडीत
सुट्यांचा परिणाम : महावितरणच्या वीज कपातीची ग्राहकांनी घेतली धास्ती
गडचिरोली : महावितरणच्या वतीने घरगुती, औद्योगिक, वाणिज्यीक थकबाकीदार ग्राहकांविरोधात वीज पुरवठा खंडीत करण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईची धास्ती घेऊन गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील वीज ग्राहक वीज देयकाचा भरणा करण्यासाठी स्वीकृती केंद्रावर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील महावितरण कार्यालयात वीज बिल स्वीकृती केंद्र आहे. या केंद्रावर सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी ८ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत वीज बिलाची रक्कम स्वीकारली जाते. तसेच महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारला स्वीकृती केंद्र बंद ठेवण्यात येते. गडचिरोली शहराची लोकसंख्या वाढली असून वीज ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली शहराच्या बाराही प्रभागात वीज बिल ग्राहकांच्या घरी पोहोचविण्यासाठी बराच विलंब होतो. त्यामुळे वीज ग्राहकांना वीज देयकाचा भरणा करण्यासाठी धावपळ करावी लागते. शनिवार व रविवारी सलग सुट्या आल्याने २६ डिसेंबर रोजी सोमवारला वीज देयकाचा भरणा करण्यासाठी गडचिरोली शहरातील वीज ग्राहकांनी चामोर्शी मार्गावरील स्वीकृती केंद्रावर दुपारी ११.३० ते १२.३० वाजताच्या सुमारास गर्दी केली होती. (स्थानिक प्रतिनिधी)
आॅनलाईन वीज बिल भरण्यास अल्प प्रतिसाद
४वीज ग्राहकांना घरबसल्या वीज बिलाचा भरणा करता यावा, तसेच त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी महावितरणने आॅनलाईन वीज बिल भरण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आॅनलाईन पध्दतीने वीज बिल भरण्याच्या प्रक्रियेला वीज ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. आजही अनेक वीज ग्राहक स्वीकृती केंद्रावर जाऊन वीज बिलाचा भरणा करीत असल्याचे दिसून येते. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक आॅनलाईन प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहेत.