ऋषिपंचमीनिमित्त मार्कंडात उसळली भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:48 AM2019-09-04T00:48:04+5:302019-09-04T00:49:10+5:30
आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सात्विकतेला, त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे. ज्ञान, विज्ञान व पुराणे यांची दीक्षा देण्याचे काम ऋषीमुनी फार पूर्वीपासून करीत होते. ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे ऋषीपंचमीनिमित्त ३ सप्टेंबर रोजी मंगळवारला महामृत्यूंजय मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी तसेच पूजाअर्चा करण्याकरिता महिला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. परिणामी मार्र्कंडादेव येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मार्र्कंडादेव येथे उत्तरवाहिनी झालेल्या वैनगंगा नदीच्या तिरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
महाशिवरात्री, श्रावणमास यासह वर्षभर मार्र्कंडादेव येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. गणेश चुतर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे, भाद्रपद शुध्द पंचमीला अर्थातच ऋषीपंचमीला महिला हे व्रत करीत असतात. आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सात्विकतेला, त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे. ज्ञान, विज्ञान व पुराणे यांची दीक्षा देण्याचे काम ऋषीमुनी फार पूर्वीपासून करीत होते. ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो. अशा थोर ऋषींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला श्रावणमासात व्रत ठेवत असतात. ऋषी पंचमीनिमित्त सप्तऋषींची उपवासना करून उपवास करावा, अशी आख्यायिका आहे.
अशा या ऋषीपंचमीनिमित्त मंगळवारी महिला भाविक मोठ्या संख्येने मार्र्कंडेश्वराच्या मंदिरात दाखल झाल्या होत्या, अशी माहिती येथील पुजारी अरूण गायकवाड महाराज, रूपेश गायकवाड महाराज यांनी लोकमतशी बोलताना दिली. मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने येथे भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या वतीने वैनगंगा नदी तिरावर तसेच मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आजदिवसभर पाऊस असल्याने प्रशासनाकडून मार्र्कंडादेव येथे सोयीसुविधा व सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेतली जात होती.