लोकबिरादरी प्रकल्पात रुग्णांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:56 AM2019-01-19T00:56:06+5:302019-01-19T00:57:23+5:30
तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात १८ ते २० जानेवारीदरम्यान शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध व्याधींनी ग्रस्त रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे लोकबिरादरीच्या परिसरात रुग्ण व नातेवाईकांची गर्दी दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात १८ ते २० जानेवारीदरम्यान शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध व्याधींनी ग्रस्त रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे लोकबिरादरीच्या परिसरात रुग्ण व नातेवाईकांची गर्दी दिसून येत आहे.
दुर्गम भागातील आदिवासी नागरिक आर्थिक परिस्थितीमुळे खासगी डॉक्टरांकडे उपचार घेऊ शकत नाही. त्याचबरोबर जिल्हा, तालुकास्थळी असलेल्या शासकीय रुग्णालयातही जाऊ शकत नाही. परिणामी सदर रुग्ण हालअपेष्टा सहन करीत जीवन जगत राहतात. अशा रुग्णांसाठी लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने १९८५ पासून शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही तीन दिवस शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरासाठी ५० ते ६० तज्ज्ञ डॉक्टरांची चमू हेमलकसा येथे दाखल झाली आहे. दुर्गम भागातील नागरिकांबरोबरच छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातीलही रुग्ण हेमलकसा येथे दाखल झाले आहेत.
यावर्षी जवळपास ४०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा येत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी लोकबिरादरीचा परिसर फुलून गेला आहे. सदर शिबिराला नागपूर येथील रोटरी क्लब, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने मदत केली आहे. समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या मार्गदर्शनात डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे हे शिबिराची व्यवस्था सांभाळीत आहेत.
बबन पांचाळ, संध्या येम्पलवार, गणेश हिवरकर, जगदीश बुरडकर, प्रकाश मायरकार, शारदा ओक्सा, शारदा भसारकर, रमिला वाचामी, सविता मडामी, जुरी गावडे, अरविंद मडावी, शंकर गोटा, सुरेंद्र वेलादी, विनोद बानोत, शांता पोरतेट, माधुरी कोसरे, प्रियंका संगमवार, प्रेमिला मडावी, दीपमाला भगत, प्रियंका सडमेक आदी सहकार्य करीत आहेत. रोटरी क्लबच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.