लसीकरणासाठी भेंडाळा केंद्रावर जिल्ह्याबाहेरील लोकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:37 AM2021-05-13T04:37:11+5:302021-05-13T04:37:11+5:30

भेंडाळा : येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात मागील चार ते पाच दिवसांपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व ४४ वर्षांवरील ...

Crowd of people from outside the district at Bhendala center for vaccination | लसीकरणासाठी भेंडाळा केंद्रावर जिल्ह्याबाहेरील लोकांची गर्दी

लसीकरणासाठी भेंडाळा केंद्रावर जिल्ह्याबाहेरील लोकांची गर्दी

Next

भेंडाळा : येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात मागील चार ते पाच दिवसांपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व ४४ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी गर्दी करणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे त्यात स्थानिक नागरिकांपेक्षा बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. यावेळी शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचा फज्जा उडण्यासोबतच स्थानिक नागरिकांच्या हक्काची लस दुसऱ्यांना मिळत आहे.

याठिकाणी गर्दी करणाऱ्या नागरिकांमध्ये बहुतांश लोक हे बाहेरील जिल्ह्यातून म्हणजे नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातूनही आले आहेत. त्यामुळे भेंडाळा परिसरातील स्थानिकांना या लसीकरणाचा कितपत फायदा होईल? असा प्रश्न निर्माण होत आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे कुठलाही व्यक्ती, कोणत्याही जिल्ह्यातील असला तरी त्याने जर आपले नाव नोंदविले आणि त्याला लसीकरणाची तारीख मिळाली तर तो त्या केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतो. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना त्या व्यक्तीला लस देणे भाग पडते.

भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काहीसे असेच होत असल्याचे सध्या दिसत आहे. इतर जिल्ह्यातील लोकांमुळे भेंडाळा परिसरातील नागरिकांना लस घेण्याची तारीख मिळणे कठीण झाले आहे. कारण ऑनलाईन प्रक्रियेमघ्ये स्पष्ट दाखवत आहे की, भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी १३ तारखेपर्यंत शेडयुल्ड पॅक आहे. त्यामुळे अनेक स्थानिक लोक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत सध्या आहेत. भेंडाळा परिसरात पाहिजे त्या प्रमाणात ऑनलाईन वर्क करण्याच्या सोयी नसल्याने आणि अजूनपर्यंत या लोकांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात लसीकरणाबाबत जनजागृती झाली नसल्याने बऱ्याच नागरिकांनी अजूनपर्यंत या वेबसाईटवर आपले नावच नोंदवलेले नाही. त्यामुळे स्थानिकांना डावलून इतर जिल्ह्यातील लोक या केंद्रामध्ये लसीकरण करून घेत असल्याचे चित्र सध्या या केंद्रामध्ये आहे. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांचा हिरमोड होत असून, आम्हाला कधी लस मिळणार, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन योग्य ती भूमिका मांडावी, असे मत भेंडाळा परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले आहे.

लसीकरणासाठी नाव नोंदवलेले बाहेरील जिल्ह्यातील नागरिक हरणघाट मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करून भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी जात आहेत. त्यामुळे याठिकाणी भरपूर गर्दी होत आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतून नागरिक लस टोचण्यासाठी येथे येत असल्याने स्थानिकांना लस मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

काेट :

कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नावनोंदणीची प्रक्रिया असल्यामुळे ज्या व्यक्तीला जी तारीख लसीकरणासाठी मिळते त्याच तारखेला त्या व्यक्तीला लस देत असतो. तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातील असला तरी त्याला लस द्यावी लागते. आतापर्यंत बाहेरील जिल्ह्यातील अनेक लोकांना आमच्या केंद्रामध्ये लस दिली गेली आहे.

- डॉ. विजय साबणे, वैद्यकीय अधिकारी, भेंडाळा प्रा. आ. केंद्र

Web Title: Crowd of people from outside the district at Bhendala center for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.