सन्मानासाठी कामगारांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:18 AM2019-07-11T00:18:46+5:302019-07-11T00:19:56+5:30
इमारत व इतर बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांसाठी राज्य शासनाने अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी झाल्यास काही आर्थिक लाभ मिळत असल्याने नोंदणी करण्यासाठी गडचिरोली तालुक्यातील नागरिकांनी स्थानिक नगर परिषदेत बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : इमारत व इतर बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांसाठी राज्य शासनाने अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी झाल्यास काही आर्थिक लाभ मिळत असल्याने नोंदणी करण्यासाठी गडचिरोली तालुक्यातील नागरिकांनी स्थानिक नगर परिषदेत बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
केंद्र व राज्य शासन कामगारांच्या हितासाठी अनेक योजना राबवितात. मात्र गावखेड्यात काम करणारे कामगार संघटीत नाही. तसेच या योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाकडे त्यांची नोंदणी सुद्धा नाही. नोंदणीच्या माध्यमातून कामगारांना योजनांचा लाभ देता यावा, यासाठी नोंदणीचे शिबिर सुरू करण्यात आले आहेत.
गडचिरोली शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी मागील चार दिवसांपासून नगर परिषदेच्या इमारतीत शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात नोंदणी केली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेकडो कामगार नगर परिषदेत येत आहेत. बुधवारी दिवसभर या ठिकाणी कामगारांची प्रचंड गर्दी जमली होती. दिवस संपूनही अनेकांची नोंदणी न झाल्याने अनेकांना परत जावे लागले. गर्दीमुळे या ठिकाणी बराच गोंधळ उडत होता. मात्र येथील कर्मचाऱ्यांनी गोंधळ होणार नाही, याची विशेष खबरदारी घेतली आहे.
नोंदणीसाठी मागील ९० दिवस किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, बँक पासबुकची प्रत व पासपोर्ट साईजचे तीन छायाचित्र आवश्यक आहेत. इमारत, रस्ते, कालवे, दगड काम, लादी व फरशी काम, रंग काम, सुतार काम, प्लबिंग, इलेक्ट्रीशियन, विद्युत काम, अग्निशनम यंत्रणेचे काम, काचेचे काम, विटा, स्वयंपाक घरातील आधुनिक उपकरण दुरूस्ती, सिमेंट काँक्रिटशी निगडीत कामे आदी कामांवर काम करणारे मजूर या योजनेसाठी पात्र ठरतात. गडचिरोली जिल्ह्यात विविध कामे करणाऱ्या मजुरांची संख्या अधिक असल्याने नोंदणीसाठी गर्दी केली होती.
प्रमाणपत्र आवश्यक
अर्ज करण्यासाठी नोंदणीकृत कंत्राटदाराचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जे मजूर त्यांच्या कामावर येत नाही, त्यांनाही प्रमाणपत्र देत आहेत. एकेका कंत्राटदाराने २०० हून अधिक मजुरांना प्रमाणपत्र दिले आहेत. सोबत लॉसन्सही दिले असल्याने तेवढ्या मजुरांची नोंद त्याच्या नावाने होणार आहे. त्यामुळे भविष्यात कंत्राटदारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
या योजनांचा मिळतो फायदा
कामगारांच्या दोन पाल्यांना पहिली ते सातवीपर्यंत २ हजार ५०० रुपये, आठवी ते दहावीपर्यंत पाच हजार रुपये, अकरावी, बारावीमध्ये १० हजार रुपये, पदवीचे शिक्षण घेणाºयाला प्रती वर्ष २० हजार रुपये, वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपये, अभियांत्रिकीसाठी ६० हजार रुपये एवढे शैक्षणिक सहाय्य दिले जाते.
कामगार किंवा त्याच्या कुटुंबियांना आजार, अपंगत्व कालावधीत मदत दिली जाते. दोन अपत्यापर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार रुपये, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी २० हजार रुपये मदत दिली जाते. नोंदीत बांधकाम कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना पाच लाख रुपये, नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मदत दिली जाते.