बॅंकांमध्ये उसळली ग्राहकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:34 AM2020-12-29T04:34:23+5:302020-12-29T04:34:23+5:30
आष्टी : शुक्रवार २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत सर्व बॅंका बंद हाेत्या त्यामुळे विविध कामांसाठी पैसे काढणे व ...
आष्टी : शुक्रवार २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत सर्व बॅंका बंद हाेत्या त्यामुळे विविध कामांसाठी पैसे काढणे व पैसे भरण्यासाठी आष्टी येथील बॅंकांमध्ये साेमवारी ग्राहकांची गर्दी उसळली. या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या नंबर केव्हा येताे याची प्रतीक्षा करीत हाेते.
आष्टी हे गाव चामाेर्शी तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे. गडचिराेली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून आष्टी गावाची ओळख आहे. आष्टी परिसरात ३० ते ३५ गावे येतात. चामाेर्शी तालुक्याच्या गावांसह अहेरी, मुलचेरा तालुक्यातील गावांचा समावेश आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्याच्या गाेंडपिपरी तालुक्यातील अनेक गावच्या नागरिकांचे खाते आष्टी येथील बॅंकेत आहेत. येथे प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्टेट बँक व ग्रामीण बँक आहे. तीनही बॅंकांमध्ये ग्राहकांची लाखाे खाती आहेत.
सलग तीन दिवस बॅंक बंद राहिल्याने साेमवारी सकाळपासूनच ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली हाेती. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खिडकीजवळ लांबच लांब रांग लागलेली होती. काही वृद्ध व्यक्ती बाकावर बसून आपला नंबर केव्हा येईल, याची प्रतीक्षा करीत होते. स्टेट बँकमध्ये सुद्धा ग्राहकांची लांबच लांब रांग लागली हाेती. अनेक वयाेवृद्ध नागरिकांना रांगेत उभे राहणे शक्य नव्हते. त्यामुळे बरेच जण बाकावर बसून हाेते.
बाॅक्स
ज्येष्ठांसाठी स्वतंत्र काऊंटरची गरज
बॅंकेचे व्यवहार करताना नेहमीच ज्येष्ठ नागरिकांना गर्दीपासून त्रास सहन करावा लागताे. ही समस्या अनेक वर्षांपासूनची आहे. त्यामुळे प्रत्येक बॅंकेत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काऊंटरची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र रांग लावली जाते, त्याच धर्तीवर ज्येष्ठांसाठी स्वतंत्र काऊंटरची साेय बॅंकांनी करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून हाेत आहे.