सीआरपीएफच्या महानिरीक्षकांनी अहेरीत घेतला सुरक्षेचा आढावा
By Admin | Published: June 15, 2017 01:18 AM2017-06-15T01:18:42+5:302017-06-15T01:18:42+5:30
अहेरी येथील प्राणहिता पोलीस कॅम्पमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ बटालियनमध्ये मंगळवारी पश्चिम विभागाचे पोलीस महानिरीक्षक
अडचणींवर चर्चा : नक्षल्यांविरूद्ध प्रभावी कारवाई करण्याची रणनीती
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी येथील प्राणहिता पोलीस कॅम्पमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ बटालियनमध्ये मंगळवारी पश्चिम विभागाचे पोलीस महानिरीक्षक राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला गडचिरोलीचे पो. उपमहानिरीक्षक दिनेश उनियाल, सीआरपीएफच्या ३७ आणि १९१ बटालियनचे कमांडंट व इतर अधिकारीगण उपस्थित होते.
या बैठकीत नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलाविरूद्ध आखल्या जात असलेल्या रणनितीवर चर्चा झाली. त्यांच्या कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर विचारविमर्श करण्यात आला. तसेच नक्षलविरोधी अभियान राबविताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याबाबतही चर्चा झाली.
या बैठकीनंतर महानिरीक्षकांनी ३७ बटालियनच्या जवानांसाठी तयार केलेल्या वातानुकूलीत सलुनचे उद्घाटन करून जवानांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यात कार्यरत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियनमध्ये मोठ्या संख्येने जवान तैनात आहेत. नक्षलविरोधी अभियान राबविताना त्यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यावर मात करीत कर्तव्य बजावताना त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांची ही भेट महत्वपूर्ण असते.