कृउबासचे विभाजन रखडले
By admin | Published: November 4, 2014 10:39 PM2014-11-04T22:39:02+5:302014-11-04T22:39:02+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यासाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत.
शेतकरी अडचणीत : १२ तालुक्यांसाठी केवळ चार बाजार समित्या
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यासाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. परंतु नव्या बाजार समित्यांच्या प्रस्तावावर तत्कालीन आघाडी सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
२६ आॅगस्ट १९८२ ला निर्माण झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व अहेरी या चार ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. आरमोरी बाजार समितींतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी या चार तालुक्यांचा कारभार आहे. गडचिरोली बाजार समिती अंतर्गत गडचिरोली, धानोरा या दोन तालुक्यांचा कारभार आहे. तर चामोर्शी व मुलचेरा या दोन तालुक्याचा कारभार चालतो. अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी या चार तालुक्यासाठी अहेरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. ज्या ठिकाणी बाजार समिती आहे. त्या ठिकाणापासून संलग्न तालुक्याचा अंतर हे दीडशे किमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आरमोरी बाजार समितीचे विभाजन करून देसाईगंज व अहेरी बाजार समितीचे विभाजन करून सिरोंचा येथे नवी बाजार समिती निर्र्माण करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे.
आरमोरी येथील बाजार समितीच्या विभाजनाला आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन काँग्रेस आमदारांनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे न्यायालयातही या संदर्भातील प्रकरण गेले होते. न्यायालयाने या प्रकरणी शासनाला काही दिशानिर्देशही दिले होते. आरमोरी बाजार समितीचा सर्व व्यापार हा देसाईगंजच्या भरवशावर चालतो. देसाईगंज येथे उपबाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. मात्र येथे आवश्यक सोयीसुविधांचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लूट या ठिकाणी केली जात आहे. आरमोरी बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या कुरखेडा व कोरची तालुक्याला देसाईगंज हे जवळचे ठिकाण पडते. त्यामुळे देसाईगंज येथे नवी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीने सिरोंचा येथे नवी बाजार समिती सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. याबाबत शासनाकडेही प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. तसेच गडचिरोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार यार्डातून चालतच नाही.
गडचिरोली शहरातील काही ठरावीक व्यापाऱ्यांच्या घरीच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काटे केले जातात व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा आर्थिक शोषण ही व्यापारी मंडळी करीत आहेत. सदर बाजार समितीला चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत संलग्न करावे, अशीही एक मागणी शेतकऱ्यांची आहे. शासनाने नव्या बाजार समितीच्या निर्मितीबाबत तत्काळ पाऊल उचलावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)