मका पिकाचे लागवड क्षेत्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:46 AM2018-03-10T01:46:17+5:302018-03-10T01:46:17+5:30
तृणधान्य पिकांमध्ये गहू, धान, पिकानंतर मक्याचा समावेश होतो. पाण्याची उपलब्धता, हवामान यानुसार सदर पिके घेतली जातात. परंतु भिन्न हवामानाशी जलद समरस होण्याची क्षमता असलेल्या मका पिकाकडे जिल्ह्यातील शेतकरी वळला आहे.
ऑनलाईन लोकमत
वैरागड : तृणधान्य पिकांमध्ये गहू, धान, पिकानंतर मक्याचा समावेश होतो. पाण्याची उपलब्धता, हवामान यानुसार सदर पिके घेतली जातात. परंतु भिन्न हवामानाशी जलद समरस होण्याची क्षमता असलेल्या मका पिकाकडे जिल्ह्यातील शेतकरी वळला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र वाढले आहे. कुरखेडा तालुक्यातील मिरची लागवड करणारे शेतकरी आता मका लागवडीकडे वळले आहेत.
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे मिरचीची लागवड पूर्वी केली जायची. येथील मिरची विदर्भात प्रसिद्ध होती. परंतु मिरची पिकासाठी मोठी बाजारपेठ तसेच मिरची लागवड खर्च, ढगाळ वातावरणाचा होणारा वाईट परिणाम, कीटकनाशकांचा खर्च यासह विविध कारणांमुळे मिरची लागवडीचे क्षेत्र झपाट्याने घटले. कुरखेडासह कोरची, आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकरी मका पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. अत्यंत कमी लागवड खर्च यामुळे मक्याची शेती शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा विविध कामांसाठी उपयोग होत असल्याने मक्याची मागणी वाढत असून कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. परिसरातील मका मध्यप्रदेशात पाठविला जात आहे. त्यामुळे मका हे उष्ण हवामानाला प्रतिसाद देणारे असले तरी या पिकाची लागवड शेतकरी रबी हंगामात करीत आहेत. सध्या मका पीक जोमात असून काही दिवसांपासून बाजारातही दाखल झाला आहे. यातून शेतकऱ्यांना बऱ्या प्रमाणात आर्थिक उत्पादन मिळत आहे.
धान, मिरची व इतर पिकांपेक्षा कमी श्रमात अधिक उत्पादन मका पिकातून घेता येते. शेतीच्या बांधावरच व्यापारी येत असल्याने मक्याची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण जात नाही. मागील दोन वर्षांपासून आपण मक्याचे पीक घेत असून मक्याची शेती धान व मिरचीपेक्षा फायद्याची ठरत आहे.
- गिरीधर दडमल, शेतकरी, उराडी, तालुका कुरखेडा