चामोर्शी तालुक्यात ३७ हजार हेक्टरवर हाेणार लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:26 AM2021-06-03T04:26:36+5:302021-06-03T04:26:36+5:30
तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे क्षेत्र असून, गेल्या काही वर्षांत कापूस पिकाच्या क्षेत्रातही वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात दिना ...
तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे क्षेत्र असून, गेल्या काही वर्षांत कापूस पिकाच्या क्षेत्रातही वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात दिना जलाशयासह लहान-मोठ्या तलावांच्या सहायाने सिंचन केले जाते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी वेळेवर व चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. येथील शेतजमीन भातपिकासाठी उत्तम असल्याने खरीप हंगामात धान पिकाचे उत्पादन हमखास होत असते. कृषी विभागाच्या नियोजनानुसार तालुक्यातील चामोर्शी, कुनघाडा, येणापूर, आष्टी, घोट परिसरात यावर्षी धान ३२ हजार हेक्टर, कापूस ५ हजार हेक्टर, तूर बांधावर २ हजार हेक्टर तर सलग क्षेत्रामध्ये ५० हेक्टर, इतर कडधान्य व गळीत धान्य ३०० हेक्टर, भाजीपाला १०० हेक्टर, सोयाबीन १०० हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट आहे.
चिखलणीत योग्य पाऊस उपलब्ध न झाल्यामुळे धान रोपांचे पऱ्हे अवस्थेतच वय वाढते. ३० दिवसांपेक्षा जास्त वयाच्या धानाच्या रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादन कमी होते. अशा वेळी पेरीव धान एक उत्तम पर्याय आहे. पेरीव धानामुळे चिखलणी व रोवणी करणे, रोपे खोदणे, पेंड्या पसरविणे, नर्सरी पोसणे इत्यादी कामावरील खर्च कमी करता येतो. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके पेरणीकरिता जमीन लवकर उपलब्ध होते. कमी पर्जन्यमान असताना वेळेवर पेरणी करता येईल व त्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल. कमी मजूर व कमी खर्चात लागवड करता येईल. शेतामध्ये शेणखत व हिरवळीच्या खताचा वापर करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. धान पिकामध्ये युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर करावा तसेच रासायनिक खते योग्य वेळी योग्य प्रमाणात द्यावे. कीड रोगाच्या नियंत्रणाकरिता बांधीत उतरून पिकाची पाहणी करावी. कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाॅक्स
सोयाबीन पेरणी बीबीएफ पद्धतीद्वारे
बीबीएफ पेरणी यंत्राच्या साहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्याने मूलस्थानी जलसंधारण होते. बीबीएफमुळे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अधिक उत्पन्न मिळते. पावसात खंड पडल्यास अथवा पाणी कमी असल्यास या पद्धतीमुळे वरंब्यावर ओलावा टिकून ठेवला जातो. पिकाला पाण्याचा ताण कमी पडत नाही. पाऊस जास्त झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी बाहेर पडते. मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकांची जोरदार वाढ होते. कीडरोगास पीक बळी पडत नाही. सोयाबीन पेरणीसाठी २० ते २५ टक्के बियाणे कमी लागते. पाण्याची बचत होते. उत्पन्नामध्ये २० ते ३० टक्के हमखास वाढ होते. पिकांची आंतरमशागत करणे, पीक मोठे झाल्यावर सरीमधून औषध फवारणी करणे. आवश्यकता भासल्यास स्प्रिंकलरद्वारे संरक्षित पाणी देण्यासाठी ही पेरणी पद्धत फायदेशीर ठरते.
===Photopath===
020621\img-20210602-wa0113.jpg
===Caption===
32 हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची लागवड फोटो