संचारबंदीने दुधाचे दर उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:43+5:30
गाय व म्हशीच्या दुधाचा विचार केल्यास म्हशीच्या दुधाला अधिक भाव मिळतो. दुधातील फॅटनुसार गाय व म्हशीच्या दुधाचा भाव वेगळा असतो. लॉकडाऊनपूर्वी दूधडेअरीमार्फत पशुपालकांकडून दुधाची खरेदी सुरू होती. आताही आहे. मात्र लॉकडाऊनपूूर्वी पशुपालकाला प्रती लीटर २५ ते ३० रुपये भाव दूधडेअरीकडून मिळत होता. आता भावात घसरण झाली असून लीटरमागे २१ ते २६ रुपये दिले जात आहे.
अतुल बुराडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : कोरोना विषाणूूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू आहे. गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे काही अटींवर सुट मिळाली आहे. मात्र लॉकडाऊनच्या पूर्वी आणि आताच्या परिस्थितीचा विचार केल्यास गाय व म्हशीच्या दुधाच्या दरात बदल झाला आहे. कोरोना संचारबंदीमुळे दुधाचे दर पाच ते सहा रुपयांनी उतरले असल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत.
गाय व म्हशीच्या दुधाचा विचार केल्यास म्हशीच्या दुधाला अधिक भाव मिळतो. दुधातील फॅटनुसार गाय व म्हशीच्या दुधाचा भाव वेगळा असतो. लॉकडाऊनपूर्वी दूधडेअरीमार्फत पशुपालकांकडून दुधाची खरेदी सुरू होती. आताही आहे. मात्र लॉकडाऊनपूूर्वी पशुपालकाला प्रती लीटर २५ ते ३० रुपये भाव दूधडेअरीकडून मिळत होता. आता भावात घसरण झाली असून लीटरमागे २१ ते २६ रुपये दिले जात आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी गायीच्या दुधाला प्रती लीटर २१ ते २६ रुपये भाव होता. परंतु सध्या प्रती लीटर १७ ते २२ लीटर भाव आहे. सदर दुधाचा भाव हा शासकीय नाही. खासगी दूधडेअरीचा हा भाव आहे. परिसरातील गाई व म्हशींचे दूध खासगी कंपन्या संकलीत करतात. कोरोनाच्या संचारबंदीपूर्वी व आता सुद्धा गाई व म्हशीच्या दुधाचा भाव सारखाच म्हणजे प्रती लीटर ३४ रुपये आहे.
ग्रामीण भागात काही शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह गाई, म्हशींच्या उदरनिर्वाहावर चालत असतो. पण ५० पेक्षा अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोना संचारबंदीत बऱ्याच दिवस दुधाचे संकलन डेअरींमार्फत बंद होते. परिणामी पशुपालक शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागल्या. गाई, म्हशींच्या वैरणासाठी चुरी, मका चुरी, सरकी ढेप, चना चुरी व बांधावरील गवताचा उपयोग केला जातो. दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी संकरित गाईला पशुखाद्य विकत घेऊन खाण्यासाठी देतात. परंतु कोरोनाच्या संचारबंदीमुळे पशु खाद्याच्या किमती वाढत असल्याचे विसोरा येथील पशुपालक प्रमोद ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे जनावरांसाठी सकस व कमी दरात खाद्य, चारा उपलब्ध करून देणारी नवीन पद्धत निर्माण करणे गरजेचे आहे. पशुसंवर्धन विभागने सवलतीत वैरण पुरविण्याची आवश्यकता आहे.
फॅटच्या दुधात गोलमाल
दूध घेऊन पशुपालक डेअरीमध्ये आल्यानंतर दुधाचे फॅट काढले जाते. यासाठी डेअरीचालक प्रत्येक उत्पादकाकडून ५० ते १०० मिली दूध घेतो. पण फॅट काढल्यानंतर हे दूध संबंधित शेतकऱ्याच्या मापात परत ओतले जात नाही. फॅटच्या नावाखाली दूधडेअरीचालक दूध स्वत:च्या कॅनमध्ये ओतत असल्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
कुलिंग चॉर्जेसच्या नावाखाली शहरी भागात लूट
गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी तालुका मुख्यालयासह शहरी भागात पॉकेट बंद दूध दररोज येतो. दुधावर २० रुपये छापील किंमत असले तरी बरेच विक्रेते २२ ते २५ रुपये घेतात. १२ रुपयांचा पॉकेट १५ रुपयाला विकल्या जातो. एकूणच कुलिंग चॉर्जेसच्या नावाखाली उन्हाळ्यात शहरी भागात नागरिकांची दुधाच्या व्यवहारात आर्थिक लूट केली जाते. संबंधित शासकीय यंत्रणेने फंटर ग्राहकाच्या माध्यमातून दुधाच्या काळाबाजाराची पोलखोल करून संबंधितांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.