हेलिकॉप्टर प्रवासाची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 12:02 AM2019-04-07T00:02:30+5:302019-04-07T00:03:34+5:30
दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर मतदान केंद्राधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहोचविले जाणार आहे. मागील निवडणुकीतही हेलिकॉप्टरचा वापर झाला होता. यावर्षी दोन हेलिकॉप्टर प्रशासनाने निवडणुकीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर मतदान केंद्राधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहोचविले जाणार आहे. मागील निवडणुकीतही हेलिकॉप्टरचा वापर झाला होता. यावर्षी दोन हेलिकॉप्टर प्रशासनाने निवडणुकीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. अनेकांनी विमान व हेलिकॉप्टरचा प्रवास केला नाही. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या प्रवासाबाबत कमालीची उत्सुकता आहे.
एरवी दुर्गम भागात सेवा देण्यास टाळणारे कर्मचारी हेलिकॉप्टर प्रवासाच्या उत्सुकतेमुळे आपला क्रमांक दुर्गम भागातील केंद्रावर लागावा, अशी अपेक्षा बाळगून आहेत. ज्या मतदान केंद्रावर हेलिकॉप्टरने पोहोचविले जात नाही अशा मतदान केंद्रावर मात्र संबंधित अधिकाऱ्यांना पायीच जावे लागणार आहे. याचा त्रासही होणार आहे. १० ते १५ किमीपर्यंत पायी जावे लागणार आहे. ४० वर्ष वयानंतरच्या कर्मचाºयांची नेमणूक दुर्गम भागातील केंद्रांवर केली जाणार आहे.