ग्राहक सेवाकेंद्र कुलूूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:30 AM2018-01-11T00:30:46+5:302018-01-11T00:32:42+5:30

चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे नागरिकांच्या सोयीसाठी ग्राहक सेवा केंद्र निर्माण करण्यात आले. परंतु सदर केंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कामे करताना अडचणी येत आहेत.

Customer Service Center Kulupubandh | ग्राहक सेवाकेंद्र कुलूूपबंदच

ग्राहक सेवाकेंद्र कुलूूपबंदच

Next
ठळक मुद्देसमस्येकडे दुर्लक्ष : सहा महिन्यांपासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने ग्राहक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे नागरिकांच्या सोयीसाठी ग्राहक सेवा केंद्र निर्माण करण्यात आले. परंतु सदर केंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कामे करताना अडचणी येत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
लखमापूर येथे मोठी बँक नसल्याने येथील नागरिक आर्थिक व्यवहार करण्यासाठी भेंडाळा तसेच चामोर्शी येथे जात होते. मात्र हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी लखमापूर बोरी येथे चामोर्शी स्टेट बँक अंतर्गत मिनी स्टेट बँक अर्थात ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात आले. मात्र सदर ग्राहक सेवा केंद्र गेल्या सहा महिन्यांपासून कुलूपबंद असल्याने आर्थिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांची प्रचंड पंचाईत होत आहे.
गावात ग्राहक सेवा केंद्र झाल्यानंतर अनेक नागरिक व मजुरांनी विविध कामासाठी येथे आपले खाते उघडले. अनेकांनी आपल्या खात्यात गुंतवणूकही केली. तसेच रोजगार हमी कामाच्या मजुरीची रक्कम, गॅस सबसीडीची रक्कम, वीज देयक आदी सुविधा नागरिकांना येथे मिळत होत्या. मात्र सुरूवातीपासूनच सदर ग्राहकसेवा केंद्राचे कामकाज संथगतीने चालविले जात होते. त्यानंतर हे ग्राहकसेवा केंद्र बंद झाले. सहा महिने उलटूनही केंद्र सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या सेवा केंद्रातील संगणक संच बंद पडल्याने त्याची दुरूस्ती झाल्यानंतरच हे सेवा केंद्र सुरू करण्यात येईल, असे कर्मचाºयांकडून सांगितले जात आहे. परंतु अनेक ग्राहकांना माहित असल्याने खातेदार सकाळी ११ वाजता येऊन येथे कामासाठी बसतात. मात्र कुलूप लागल्याचे पाहून आल्यापावली ते परत जात आहेत. त्यामुळे नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. यापूर्वी अनेकदा मागणी करण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्षच झाले.
परिसरातील खातेदारांची अडचण
शासनाच्या विविध विभागाची कामे आॅनलाईन झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही आॅनलाईन कामे केल्याशिवाय पर्याय नाही. लखमापूर बोरी येथील ग्राहक सेवा केंद्रात बल्लू, भिक्षी, रामसागर, बोरी, लखमापूर आदी चार ते पाच गावातील नागरिकांनी आपले खाते उघडले आहे. परंतु ग्राहक सेवा केंद्रच बंद असल्याने त्यांना आपली कामे करता येत नाही. अनेक दिवसांपासून आॅनलाईन कामे रखडली आहेत. परिणामी नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. काही ग्राहकांना तालुकास्तरावर कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्राहकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.

Web Title: Customer Service Center Kulupubandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.