मुरूमगाव आश्रमशाळेत सिलिंडरने घेतला पेट
By Admin | Published: November 20, 2014 10:51 PM2014-11-20T22:51:17+5:302014-11-20T22:51:17+5:30
येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रविवारी स्वयंपाक घरातील दोन गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. स्वयंपाकी स्वयंपाक करीत असताना ही घटना घडली.
दुर्घटना टळली : जळते सिलिंडर पोलीस शिपायाने काढले बाहेर
मुरूमगाव : येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रविवारी स्वयंपाक घरातील दोन गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. स्वयंपाकी स्वयंपाक करीत असताना ही घटना घडली.
शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रविवारी नेहमीप्रमाणे स्वयंपाकी स्वयंपाक करीत असताना स्वयंपाक गृहातील २२ सिलिंडरपैकी दोन सिलिंडरने अचानक पेट घेतला व मोठा विस्तव उडाला. त्यामुळे कर्मचारी व विद्यार्थी घाबरून गेले. लगेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. दोन पोलीस शिपायांनी घटनास्थळ गाठून पेटते सिलिंडर अलगदपणे उचलून बाहेर काढले. यावेळी स्वयंपाक गृहाला लागूनच धान्य भंडारही होते. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. शाळेत यावेळी १०० विद्यार्थी उपस्थित होते. पेटते सिलिंड बाहेर आणून विझविण्यात आले. मागील एक वर्षांपासून सिलिंडरचा पाईप खराब झाला. वारंवार गॅस कंपनीला सांगूनही त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित कर्मचारी, विद्यार्थ्यांनी दिली. या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक म. फ. सहारे यांना विचारणा केली असता, त्यांनी तीन-चार वेळा यापूर्वी पाईपलाईन दुरूस्तीबाबत पत्र व्यवहार केला आहे. या महिन्यातही ११ व १९ नोव्हेंबरला प्रकल्प अधिकारी यांच्या नावाने पाठविण्यात आलेले पत्र दाखविले. मात्र याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्याने घटना घडली, असे ते म्हणाले. घटनास्थळावर गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (वार्ताहर)