सात महिन्यात दीडपटीने वाढला सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:43 PM2018-11-19T22:43:15+5:302018-11-19T22:43:41+5:30
उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र दर दिवशी सिलिंडरचे भाव वाढत असून नोव्हेंबर महिन्यात सिलींडरने हजारी पार केली आहे.
शहाजी रत्नम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव (बुज.) : उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र दर दिवशी सिलिंडरचे भाव वाढत असून नोव्हेंबर महिन्यात सिलींडरने हजारी पार केली आहे. एवढा महागडा सिलिंडर खरेदी करणे शक्य नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक आता पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करून खर्चाची बचत करण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, मागील सात महिन्यात सिलिंडरच्या दरात सुमारे ४१ टक्के वाढ झाली आहे. १ एप्रिलला सिलिंडरचा भाव ७१३ रूपये होता. १ नोव्हेंबरला हा भाव १ हजार १० रूपये झाला आहे.
चुलीवर स्वयंपाक केल्यास महिलांना श्वसनाचे आजार होतात. तसेच जंगलाची तोड होते. चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे वायूप्रदुषण होते. आदी कारणे पुढे करून शासनाने गोरगरीब नागरिकांना अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला. जवळपास मोफतच गॅस उपलब्ध होत असल्याने खेड्यापाड्यातील व दुर्गम भागातील नागरिकांनी सुध्दा सिलिंडर गॅस खरेदी केला. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात आपुलकी सुध्दा प्राप्त करून घेतली. मात्र त्याचे योग्य फलित झाल्याचे दिसत नाही. वाढत्या गॅस सिलिंडरच्या दरामुळे ग्रामीण भागातील जनता मेटाकुटीस आली आहे.
एक हजार रूपये देऊन सिलिंडर खरेदी करणे शक्य नसल्याने पुन्हा चुलीवरच स्वयंपाक केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चूलमुक्त करण्याच्या शासनाच्या धोरणावर पाणी फेरले जात आहे. दुर्गम भागात घरामध्ये असलेले गॅस सिलिंडर केवळ शोभेची वस्तू बनली आहे.
शहरी भागातील नागरिकांना गॅसवर स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नसल्याने सरकारच्या नावाने बोटे मोडीत गॅस सिलिंडर खरेदी केला जात आहे. अनुदानाची रक्कम जास्त जमा होते, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अत्यंत कमी प्रमाणात रक्कम जमा होते.
तसेच एकाच वेळी हजार रूपये मोजावे लागत असल्याने रोजी रोटी करून प्रपंच भागविणाºया कुटुंबांची चांगलीच गोची होत आहे. सिलिंडरची भाववाढ अशीच चालू राहिल्यास शहरातीलही कुटुंब पुन्हा चुलीकडेच वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चहा शिजविण्यासाठीच होतो वापर
उज्ज्वला योजनेच्या सुरूवातीला सिलींडरची किंमत ६०० रूपये होती. त्यावेळी ग्रामीण भागातील नागरिक काही प्रमाणात स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करीत होते. आता मात्र सिलिंडरचा भाव एक हजार रूपये पार केल्याने केवळ पाहुणा आल्यास त्याला चहा मांडण्यासाठीच गॅसचा वापर केला जात आहे. ज्या गरीब नागरिकांकडे पैसे नाहीत, अशा नागरिकांनी तर गॅस भरणेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या घरी रिकामे हंडे दिसून येत आहेत. काही नागरिक १०० रूपयात गॅस मिळते म्हणून खरेदी करीत आहेत. मात्र पहिल्यांदा भरलेला सिलिंडर संपल्यानंतर दुसरा सिलिंडर भरलाच जात नसल्याचेही चित्र आहे. सिलिंडरच्या किंमती अशाच वाढत राहिल्यास ग्रामीण भागातील घरांमधून गॅस सिलिंडर कायमचे हद्दपार होऊन त्याची जागा पुन्हा चुलीने घेणार आहे.