अरे बाबांनाे, गावात घरकूल बांधताय की बंगला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 05:00 AM2022-02-19T05:00:00+5:302022-02-19T05:00:35+5:30
प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये दिले जातात. तसेच नरेगामार्फत १७ हजार रुपये व शाैचालयाचा लाभ घेतला नसल्यास १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो.
दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : घरकुलाचे बांधकाम १२० दिवसांच्या कालावधीत पूर्ण हाेणे आवश्यक आहे. मात्र, काही लाभार्थ्यांचे घरकूल दाेन वर्षांचा कालावधी उलटूनही पूर्ण झाले नाही. हे लाभार्थी घरकूल बांधत आहेत की बंगला, असा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेला पडला आहे.
प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या टप्यात २० हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार रुपये दिले जातात. तसेच नरेगामार्फत १७ हजार रुपये व शाैचालयाचा लाभ घेतला नसल्यास १२ हजार रुपयांचा निधी दिला जातो. घराचे बांधकाम गतीने झाल्यास प्रशासकीय यंत्रणा टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देते. मात्र, अनेक लाभार्थी घराचे काम गतीने करीत नाहीत.
माेठ्या घराचा माेह नडताे
- दीड लाख रुपयांच्या निधीतून लाभार्थ्याने २७० क्वेअर फुटाच्या दाेन खाेल्या व एक बाथरूम बांधणे अपेक्षित आहे. मात्र, घर एकदाच हाेते, असा चुकीचा समज बाळगून बरेच लाभार्थी ७०० ते ८०० फुटाचे घर बांधण्यास सुरूवात करतात. एवढे घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातही सात ते आठ लाख रुपयांचा खर्च हाेतो. शासनाने दिलेला घरकुलाचा पैसा पुरत नाही. मग घरकुलाचे काम रखडत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.
अनेक लाभार्थी कर्जबाजारी
- घरकूल मिळाल्यानंतर अनेक लाभार्थी माेठे घर बांधण्यास सुरूवात करतात. शासन केवळ दीड लाख रुपये देते. उर्वरित पैसे कर्ज घेऊन गाेळा करावी लागतात. यात अनेक घरकूल लाभार्थी कुटुंब कर्जबाजारी झाले असल्याचे दिसून येते.
- घरकूल मिळावा, यासाठी माेठी धडपड केली जाते. घरकुलासाठी ग्रामसभेत माेठे भांडण हाेते. कार्यालयाचे उंबरठे झिजविले जातात. घरकूल मिळाल्यानंतर मात्र ते बांधले जात नाही. मिळालेला निधी इतर कामांवर खर्च करतात.
दिलेल्या वेळेत घराचे बांधकाम करा
शासनाने घरकुलासाठी १२० दिवसांचा कालावधी दिला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक घरकूल या कालावधीत पूर्ण हाेत आहे. मात्र, गडचिराेली जिल्ह्यासह राज्यात घरकूल पूर्ण हाेण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो.