जुन्या पेन्शनसाठी निघणार दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:23 AM2018-08-11T01:23:28+5:302018-08-11T01:24:42+5:30
१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर शिवनेरीपासून मुंबईपर्यंत पेन्शन दिंडी काढली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर शिवनेरीपासून मुंबईपर्यंत पेन्शन दिंडी काढली जाणार आहे. यामध्ये राज्यातील हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फत शासनाला पाठविले आहे.
राज्य शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी अधिसूचना काढली. या अधिसूचनेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना १९८२ व ८४ ची निवृत्त वेतन योजना बंद करून परिभाषीत अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेचे स्वरूप आता या योजनेत सुनिश्चित निवृत्ती वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये या योजनेविषयी असंतोष आहे. आजपर्यंत अनेकवेळा निवेदने देण्यात आली. आंदोलने करण्यात आली. मात्र शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही. नवीन अंशदायी पेन्शन योजनेमुळे लाखो कर्मचाऱ्यांचे भविष्य अधांतरी आहे. त्यामुळे या योजनेचा विरोध केला जात आहे.
२ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या पर्वावर महाराष्टष्ट्रातील लाखो कर्मचारी शिवनेरीपासून मुंबई येथे पेन्शन दिंडी काढणार आहेत. मागणीची पूर्तता न झाल्यास तेथेच मंत्रालयासमोर बेमुदत सामुहिक उपोषण करणार आहेत, असे निवेदन म्हटले आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांना तहसीलदारांच्या मार्फत पाठविले आहे.
धानोरा तहसीलदारांना निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, तालुकाध्यक्ष दीपक सुरपाम, उपाध्यक्ष वर्षा गंगाखेडकर, शरद जगताप, माजीद शेख, देहारकर, दुधबावरे, शारदा गावंडे, सोनाली कंकलवार हजर होते.
कोरची येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. मुलचेरा येथे गजानन गेडाम, अशोक बोरकुटे, कुरखेडात तुळशीदास नरोटे, शिल्पा नवघडे, अशोक इंदूरकर, तांदळे, सुजीत दास, रोशन कापसे, नारायण मलिक, अमित मिस्त्री, सत्यजीत मंडल, निहार मिस्त्री, प्रविण पोटवार, अंकूश मैलारे, प्रणय कयाल, प्रणव देवनाथ, चामोर्शी येथे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अंकूश मैलारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.