भंडारेश्वर मंदिराच्या चबुतऱ्याला पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 01:22 AM2018-08-25T01:22:43+5:302018-08-25T01:23:35+5:30
विदर्भातील सप्तधामापैकी एक धाम हे भंडारेश्वर मंदिर आहे. सदर मंदिर आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे आहे. गावाच्या उत्तरेला खोब्रागडी, वैलोचना, नाडवाही या तीन नदींचा संगम असून या संगमाच्या काठावर एका उंच टेकडीवर भंडारेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : विदर्भातील सप्तधामापैकी एक धाम हे भंडारेश्वर मंदिर आहे. सदर मंदिर आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे आहे. गावाच्या उत्तरेला खोब्रागडी, वैलोचना, नाडवाही या तीन नदींचा संगम असून या संगमाच्या काठावर एका उंच टेकडीवर भंडारेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाळ्यात पाणी गळती लागत असून मंदिराच्या चबुतऱ्याला भेगा पडल्या आहेत. मात्र या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडा येथे जे हेमांडपंथी मंदिर आहे, तशाच प्रकारचे भंडारेश्वर हे हेमांडपंथी मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. येथे बारमाही भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. मात्र आता मंदिराच्या अस्तित्वाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिराच्या गाभाऱ्या पाणी गळती होत असून याबाबत स्थानिक भंडारेश्वर मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी सूचना केली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाचे मुख्य अभियंता गौंडा हे फेब्रुवारी महिन्यात वैरागड येथे आले होते. त्यांनी भंडारेश्वर मंदिराची पाहणी करून पाणीगळती बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते.
पुरातत्त्व विभागाकडून भंडारेश्वर मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले. दरम्यान मंदिर टेकडीच्या खालील भागाचे खोदकाम करण्यात आले. मात्र पाणीगळती संदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. पेंडाल उभारण्यासाठी तसेच इतर कामासाठी टेकडीचे खोदकाम करण्यात आले. यात्रेदरम्यान परिसराची स्वच्छता करण्याच्या नावाखाली टेकडीवर वाढलेली झाडे तोडण्यात आली. यामुळे मंदिराला इजा होऊन मंदिराच्या चबुतऱ्याला आणखी भेगा पडण्याची शक्यता आहे.
पुरातत्त्व विभागाच्या सूचनेकडे कानाडोळा
वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराच्या टेकडीवर उगवलेली झाडे व खुरटी रोप होती. यामुळे मंदिर टेकडीचा परिसर मजबूत राहत होता. टेकडीला आधारही मिळत होता. मात्र आता गेल्या अनेक वर्षांपासून टेकडीवरील झाडेझुडूपे तोडली जात असल्याने मंदिर टेकडीची झिज झाली आहे. यासंदर्भात पुरातत्त्व विभागाने मंदिर समितीला सूचनाही केल्या होत्या. मात्र या सूचनांकडे कानाडोळा केल्याने टेकडीला धोका निर्माण झाला आहे. मंदिर टेकडीच्या परिसरात कोणत्याही कामासाठी खोदकाम करण्यात येऊ नये, तसेच त्यावर उगवलेली झाडेझुडूपे तोडण्यात येऊ नये, अशी सूचना भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत करण्यात आली आहे व तसा फलकही येथे लावण्यात आला आहे. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने टेकडीला धोका होण्याची शक्यता आहे.