ढोलडोंगरी येथे चार लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:18 AM2018-06-16T00:18:39+5:302018-06-16T00:18:39+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढोलडोंगरी येथूून ३ लाख ६७ हजार २०० रूपयांची दारू जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढोलडोंगरी येथूून ३ लाख ६७ हजार २०० रूपयांची दारू जप्त केली आहे.
कोटगूल पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या ढोलडोंगरी येथील एका घरात दारूचा साठा ठेवला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बुधवारी बडीमादे येथील उदेसिंग सोनू हारामी याला विश्वासात घेऊन ढोलडोंगरी गाठले. ढोलडोंगरी येथील रामलाल पुसाजी जनबंधू याच्या घरी दारूचा साठा ठेवण्यात आला होता. त्या घराची चौकशी केली असता, या घरात ३ लाख २१ हजार रूपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली. तर ३६ हजार रूपये किंमतीच्या ५०० मिली क्षमतेच्या बॉटल असलेले बॉक्स आढळून आले. असा एकूण ३ लाख ६७ हजार २०० रूपये किंमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. सदर दारू निर्मल धमगाये याच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी उदेसिंग सोनू हारामी व रामलाल पुसाजी जनबंधू या दोघांना ताब्यात घेतले आहे. निर्मल धमगाये याच्या विरोधात कोरची पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरची तालुक्यातीलच कुमकोट येथे जानेवारी महिन्यात धमगाये याची ६० लाख रूपयांची दारू पोलिसांनी जप्त केली होती.