पोलिसांकडून दलित कुटुंबाला त्रास
By admin | Published: July 14, 2016 01:11 AM2016-07-14T01:11:23+5:302016-07-14T01:11:23+5:30
आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबोली गावालगतच्या अतिक्रमीत जमिनीवर गेल्या ४० वर्षांपासून मेश्राम कुटुंबीय शेती कसत आहे.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार : दोषींवर कारवाई करण्याची मागणी
गडचिरोली : आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबोली गावालगतच्या अतिक्रमीत जमिनीवर गेल्या ४० वर्षांपासून मेश्राम कुटुंबीय शेती कसत आहे. मात्र गावातील पोलीस पाटील व काही नागरिकांनी सदर जमिन स्मशानभूमीच्या कामासाठी मागितली. त्यानंतर मेश्राम कुटुंबीयांनी नकार दिल्याने गावातील काही नागरिकांनी या जमिनीत शेती कसण्यास विरोध करून शेतीपयोगी साहित्य हिसकावून नेले. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली आलेल्या आष्टी पोलिसांनी मेश्राम कुटुंबाला शिविगाळ करून त्रास दिला. सदर प्रकार गंभीर असल्याने दोषी पोलीस व व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे पदाधिकारी व अन्यायग्रस्त मेश्राम कुटुंबातील सदस्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी माहिती देताना फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे व अन्यायग्रस्त महिला कविता मेश्राम यांनी सांगितले की, ५ जुलै रोजी आंबोेली येथील पोलीस पाटील वंदना रामटेके, रवींद्र कातकर, राजू मांडवगडे, राजू उंदीरवाडे, बंडू चंदनखेडे, भास्कर दयाळ यांनी अतिक्रमीत जमिनीवर शेती कसण्यास विरोध करून शेतीपयोगी साहित्य हिसकावून नेले, याबाबत आपण आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, तक्रार घेतली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार, असे सांगितल्यावर पोलिसांनी तक्रार घेतली. मात्र कुणावरही गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावात येऊन आष्टीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे, पोलीस हवालदार पोटवार यांनी आम्हाला शिविगाळ केली. तसेच शेतीच्या जागेवर सर्व नागरिकांसमोर अवार्च शब्दात बोलून मला शिविगाळ केली, असे कविता मेश्राम यांनी यावेळी सांगितले.
पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करून न्याय द्यावा, अशी मागणी मेश्राम कुटुंबाने यावेळी केली. पत्रपरिषदेला दिलीप गोवर्धन, चांगदास मसराम, कबीर निकुरे, पुरूषोत्तम मेश्राम, अनूप मेश्राम, सुरेश मेश्राम, पंकज साखरे हजर होते.
आंबोली येथील कविता पुरूषोत्तम मेश्राम कुटुंबासोबत ग्रामपंचायतीचा जागेच्या विषयावरून वाद आहे. सदर जागा स्मशानभूमीची असून तिच्यावर ग्रा. पं. चा ताबा आहे. आपण चौकशी करण्यासाठी आंबोली गावात सहकारी कर्मचाऱ्यांसह गेलो होतो. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी दरम्यान नांगर चालविल्यावर जमिनीतून माणसाच्या शरीराचे हाडही निघाले. आपण कविता मेश्राम व त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची शिविगाळ व मारहाण केली नाही. ग्रामपंचायत प्रशासन आपल्या मालकीची जागा स्मशानभूमीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र मेश्राम कुटुंबाकडून सहकार्य मिळत नसल्याचे चौकशीत दिसून आले.
- संदीप शिंगटे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे, आष्टी