झिंगानूर परिसरातील बंधाऱ्याची दुरुस्ती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:44 AM2021-09-09T04:44:08+5:302021-09-09T04:44:08+5:30
झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वन विभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्य ...
झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वन विभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्य जीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच बंधारा फुटला. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने याेग्य नियाेजन करून बंधाऱ्याची दुरुस्ती केली नाही.
गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका
गडचिराेली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, या समस्येकडे कायम दुर्लक्ष होत आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अमलात आणले आहे. मात्र, कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
चातगावात कव्हरेजची समस्या
धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाइल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाइलधारक त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. येथील बिघाडाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील नाल्या गाळाने बुजल्या
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
सिरोंचा तालुक्यातील बसथांब्यांची दुर्दशा
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टीनपत्रे वादळाने उडाले. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण कायमच
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
हगणदारीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
देसाईगंज : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी शौचालये निकामी झाली आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हगणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लाेटा घेऊन रस्त्याकडेला जातात.
अल्पवयीन चालकांवर कारवाई नाही
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचा या समस्येकडे कानाडाेळा हाेत आहे.