१७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:40+5:30
खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. या जिल्ह्यात दिवाळीच्या आधीच हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात होते. दिवाळीसाठी पैसा हाती यावा म्हणून काही शेतकरी मळणीही करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने झालेल्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात १७ हजार हेक्टरवरील पीकांना पावसाचा फटका बसला आहे. त्यात १६ हजार एकरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे हे शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. सर्वाधिक नुकसान एटापल्ली तालुक्यात झाल्याची नोंद अहवालात घेण्यात आली.
यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. या जिल्ह्यात दिवाळीच्या आधीच हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात होते. दिवाळीसाठी पैसा हाती यावा म्हणून काही शेतकरी मळणीही करतात. त्याच तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांचा धान ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे पाण्यात भिजला. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पावसाने कहर केला. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजल्या. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले. त्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. केवळ धानच नाही तर दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये सोयाबीन व कापूस पिकालाही बराच फटका बसला आहे.
सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाल्याने त्याचा अहवाल लवकरच वरिष्ठांकडे पाठविला जाईल. मात्र आर्थिक मदतीचा निर्णय होण्यास वेळ लागणार आहे.
अंतिम पैसेवारी घटणार
खरीप पिकांची नेमकी स्थिती कशी आहे, याचा अंदाज येण्यासाठी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी काढली जाते. याला हंगामी पैसेवारी सुद्धा असे म्हटले आहे. या पैसेवारीचा अहवाल १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी सरासरी ६९ टक्के आढळून आली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पिकांची स्थिती थोडी कमकुवत आढळून आली. त्यामुळे सरासरी पैसेवारी ६७ टक्के दाखविण्यात आली आहे. परंतू परतीच्या पावसाने फटका बसल्यानंतर पिकांची स्थिती बिघडून उत्पन्नात घट येणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्याची अंतिम पैसेवारी घटणार आहे.
एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक नुकसान
परतीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका एटापल्ली तालुक्याला बसला आहे. या तालुक्यात तब्बल ८ हजार २१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त झाले आहे. त्यापेक्षा कमी नुकसान कोणत्याच शेतकऱ्यांचे झालेले नाही. या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या ७०७० आहेत. बाधित गावांचीही संख्या सर्वाधिक १९४ आहे. या तालुक्यात बहुतांश क्षेत्र धानपिकाचे आहे.