शेतातील वीज तारांमुळे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 09:41 PM2019-06-02T21:41:58+5:302019-06-02T21:42:24+5:30
वैरागड येथील अनिल आकरे यांच्या शेतात टॉवर लाईनच्या वीज तारा टाकून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे खरीपातील हंगाम धोक्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पॉवर ग्रिड कार्पोरेशन अंतर्गत टॉवर लाईनचे काम केले जात आहे. ही लाईन वैरागड परिसरातून गेली आहे. खांब उभे झाले असून वीज तारा टाकण्याचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैरागड येथील अनिल आकरे यांच्या शेतात टॉवर लाईनच्या वीज तारा टाकून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे खरीपातील हंगाम धोक्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या पॉवर ग्रिड कार्पोरेशन अंतर्गत टॉवर लाईनचे काम केले जात आहे. ही लाईन वैरागड परिसरातून गेली आहे. खांब उभे झाले असून वीज तारा टाकण्याचे काम सुरू आहे. आकरे यांच्या शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती. उभ्या धानातूनच वीज तारा लांबविण्यात आल्या. त्यामुळे धानाचे नुकसान झाले. धान पिकाचे जेवढे नुकसान झाले, तेवढी नुकसान भरपाई पॉवर ग्रिड मार्फत दिली जाईल, असे आश्वासन पॉवर ग्रिडच्या कर्मचाऱ्याने दिले होते. प्रभावित क्षेत्राचे मोजमाप सुध्दा करण्यात आले. मात्र अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतात पसरविलेल्या वीज तारा अजुनही कायम आहेत. आता खरीप हंगामाच्या मशागतीला सुरूवात झाली आहे. शेतातून टाकलेल्या वीज तारा अडथळा निर्माण करीत आहेत. या तारा पावसाळ्यापर्यंत कायम राहिल्यास धानाचे पिकही घेणे अशक्य होणार आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी वीज तारा उचलण्यात याव्या, तसेच उन्हाळी धानाचे जे नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आकरे यांनी केली आहे.