वादळाने अहेरी तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:39 PM2018-05-17T23:39:36+5:302018-05-17T23:39:36+5:30
अहेरी तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. यामध्ये तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी/आलापल्ली : अहेरी तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला. यामध्ये तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम यांनी केली आहे.
आलापल्ली येथील २० घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जवळपास ५० घरांचे अंशत: नुकसान झाले. गोंडमोहल्ला, पुनागुडम, मल्लेवार कॉलनी, बजरंग चौक, वन वसाहत तसेच बसस्थानक परिसरातील नागरिकांच्या कवेलु व टिनाचे पत्रे घरावरून उडाल्याने घरातील वस्तू, उपकरणे पावसामुळे ओले झाले. आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे यांनी वन वसाहतीची पाहणी केली. टिन उडून जात असल्याची तक्रार केली. गोंड मोहल्ला, पुनागुडम तसेच इतर वार्डात जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, सरपंच सुगंधा मडावी, सदस्य संतोष तोडसाम, दिलीप गंजीवार, जुलेख शेख यांनी पाहणी केली. मदतीसंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन जि.प. उपाध्यक्षांनी केले. गुरूवारीही काही वार्डातील वीज पुरवठा बंदच होता.
अहेरी तालुक्यातील सिरोंचा मार्गावरील गुड्डीगुडम येथीलही घरांचे मोठे नुकसान झाले. जि.प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी पाहणी केली. सारय्या भिमा मडावी, नामदेव धर्मा मडावी यांच्या घरावरचे छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले. निमलगुडम येथील बिच्छु पोट्टी आत्राम, दिवाकर सडमेक, वैनकतेश शिरलावार यांच्याही घरांना भेट देऊन पाहणी केली. काही घरांवर विजेचे तार तुटून पडल्याने नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तारा सुरळीत करण्याचे निर्देश वीज विभागाला दिले.