रानडुकरांकडून मका पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:34 AM2021-03-24T04:34:21+5:302021-03-24T04:34:21+5:30
धानाेरा : कमी खर्चात चांगले उत्पादन होत असल्याने मका पिकाखालील क्षेत्र तालुक्यात वाढत चालले आहे. एवढेच नाही तर अतिदुर्गम ...
धानाेरा : कमी खर्चात चांगले उत्पादन होत असल्याने मका पिकाखालील क्षेत्र तालुक्यात वाढत चालले आहे. एवढेच नाही तर अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मुरूमगाव भागातही मक्याची लागवड केली जात आहे. मात्र, रानडुकरांकडून मका पीक उद्ध्वस्त केले जात आहे.
धानाेरा तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने रबी हंगामात प्रामुख्याने उडीद, मूग, चना, कुरता, ज्वारी आदी पारंपरिक पिकांचे उत्पादन घेतात. मात्र मका हे कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक असल्याने तालुक्यातील शेतकरी या पिकाकडे वळत चालला आहे. मुरूमगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे. या परिसरातील शेती जंगलाला लागून आहे. रानडुकरांकडून मका पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले जात आहे. काही शेतकऱ्यांचे पीक तर पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.
या भागातील नागरिक जंगलातून मिळणाऱ्या वनाेपजवर जीवन जगत हाेते. मात्र, विविध कारणे पुढे करून वनविभाग वनाेपज गाेळा करण्यावरही प्रतिंबध घालत आहे. अशात काही शेतकरी आता शेतीकडे वळले हाेते. मात्र रानडुकरे व वन्यजीवांकडून शेतीचेही नुकसान केले जात आहे. नेमके काय करून जीवन जगावे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. वनविभागामार्फत पंचनामे केले जातात. मात्र, अत्यंत ताेकडी नुकसानभरपाई दिली जाते.