नाल्यांची शर्यत पार करून गाठावे लागते दामरंचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:17 AM2018-09-26T01:17:15+5:302018-09-26T01:17:58+5:30
कमलापूर पासून २२ किमी अंतरावर असलेल्या दामरंचा गावाला जाताना अनेक नदी, नाले पडतात. या नाल्यांवर पूल नाही. परिणामी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून गाव गाठावे लागते. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रेपनपल्ली : कमलापूर पासून २२ किमी अंतरावर असलेल्या दामरंचा गावाला जाताना अनेक नदी, नाले पडतात. या नाल्यांवर पूल नाही. परिणामी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून गाव गाठावे लागते. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे.
दामरंचा परिसरात अनेक लहान मोठी गावे येतात. ही सर्वच गावे घनदाट जंगलाने व्यापली आहेत. या परिसरातील अनेक गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. केवळ पायवाट आहे. पावसाळ्यात पायवाटेवर चिखल निर्माण होत असल्याने वाहनाच्या सहाय्याने मार्गक्रमण करणे कठीण होते. त्यामुळे बहुतांश रस्ता पायदळच गाठावा लागतो. मार्गात अनेक नदी, नाले आहेत. या नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर नाल्यात पाणी जमा होऊन या पाण्यातून मार्ग काढणे अशक्य होते.
पावसाळ्यात अनेक गावातील विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागते. दळणवळणाची सुविधा नसल्याने या परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. रस्ते व पुलांचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.