पावसाअभावी धानाचे झाले तणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:43 AM2018-10-29T00:43:05+5:302018-10-29T00:46:35+5:30
मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील दीड महिन्यांपासून पावसाने कायमची उसंत घेतली असल्याने ज्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणचे धानपीक करपले आहे. धानपिकाची तणीस झाली आहे.
यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक व नियमित पाऊस पडला. त्यामुळे धानाचे पऱ्हे टाकण्यापासूनचे रोवणीपर्यंतची कामे अगदी वेळेवर झाली. आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे हिरवेगार धानपीक डोलत होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने कायमची उसंत घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी तलाव, बोड्यांचे पाणी देत आहेत. त्यामुळे त्यांचे धानपीक चांगले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकºयांचे धानपीक करपले आहे.
धानामध्ये हलका, मध्यम व जास्त कालावधीचा धान लावला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, असे शेतकरी हलका व मध्यम कालावधीत निसवणारे धान लावतात. सदर धान लवकर निसवत असल्याने या धानाची रोवणी वेळेवर होणे आवश्यक आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पावसात सातत्य राहत नसल्याने धानाची रोवणी लांबत होती. याचा परिणाम हलक्या धानाच्या उत्पादनावर होत होता. त्याचबरोबर ऐन कापणीच्या कालावधीत पाऊस पडत असल्याने हलक्या धानाची नासाडी होत होती. मागील काही वर्षांचा हा कटू अनुभव लक्षात घेऊन यावर्षी काही शेतकऱ्यांनी जड धानाची लागवड केली. मात्र पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंदाज चुकला व याचा फटका यावर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील धानपीक करपायला लागले आहे.
शेतकऱ्यांनी धानपिकाच्या लागवडीवर लाखो रूपयांचा खर्च केला. मात्र ऐन धान निसवण्याच्या मार्गावर असताना पाण्याअभावी धान करपले आहे. जिल्हाभरात दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही शासनाने मात्र गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीमधून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत पुन्हा सर्वे केल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तुडतुडा रोगाचाही प्रादुर्भाव वाढला
मागीलवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा धानपीक निसवण्याच्या मार्गावर असताना तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देसाईगंज, कुरखेडा या तालुक्यांमधील काही शेतांवर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विविध प्रकारचे महागडे कीटकनाशके फवारून सुद्धा रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कित्येक एकरवरील धानपीक तुडतुडा रोगामुळे करपले होते. हीच स्थिती यावर्षीही राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कपाशी, सोयाबीनलाही फटका
कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन व कापूस पिकाची लागवड केली जाते. जिल्ह्यात दिवसेंदिवस कापूस पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मागीलवर्षी कापसाचे पीक दमदार होते. यावर्षी मात्र पावसाअभावी कापूस पीकही करपायला लागले आहे. बोंड लागण्याच्या मार्गावर असतानाच कापसाची पिके पिवळी पडली आहेत. याचा मोठा फटका कापूस उत्पादकांनाही होणार आहे. त्यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरीसुद्धा चिंतेत पडला आहे.