पालाेरा मार्गावर वीज तारांपासून नागरिकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:35 AM2021-05-17T04:35:22+5:302021-05-17T04:35:22+5:30
आरमोरी : येथील पालोरा मार्गे जाणाऱ्या टॉवर परिसरातील रस्त्याच्या कडेला विद्युत तारा लोंबकळत आहेत. आरमोरी शहरात बऱ्याच ठिकाणी अशी ...
आरमोरी : येथील पालोरा मार्गे जाणाऱ्या टॉवर परिसरातील रस्त्याच्या कडेला विद्युत तारा लोंबकळत आहेत. आरमोरी शहरात बऱ्याच ठिकाणी अशी स्थिती आहे. काही ठिकाणी विद्युत खांब कमी उंचीचे असल्याने येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने तारा ताणाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वीजपुरवठा खंडित होऊ नये तसेच दुर्घटना घडू नये, यासाठी काळजी घेणे महावितरण कंपनीचे काम आहे; परंतु याकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. या लोंबकळणाऱ्या तारांपासून दुर्घटना घडू शकते. आरमोरी येथील टॉवर परिसरातील विद्युत तार खाली रस्त्याच्या कडेला लोंबकळत आहेत. यामुळे रस्त्याने आवागमन करताना नागरिकांना विजेचा झटका लागण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीतील अधिकारी, वायरमन व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. देखभाल व दुरुस्तीअभावी अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वारंवार जिल्हास्तरावरही निवेदन देऊनही ही समस्या मार्गी लावण्यासाठी कार्यवाही झाली नाही.