परप्रांतीय शेतकऱ्यांच्या अपडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 03:05 PM2020-04-25T15:05:18+5:302020-04-25T15:07:32+5:30
तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी अहेरी परिसरात शेती केली आहे. सदर शेतकरी सातत्याने ये-जा करीत असल्याने त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.
सुरेंद्र अलोणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी अहेरी परिसरात शेती केली आहे. सदर शेतकरी सातत्याने ये-जा करीत असल्याने त्यांच्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. या शेतकऱ्यांवर प्रशासनाने प्रतिबंध घालावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील शेतकरी अहेरी परिसरातील शेतकऱ्यांची शेती भाड्याने घेतात. या शेतीमध्ये टरबूज, कापूस, मिरची आदी नगदी पिकांची लागवड करतात. या माध्यमातून ते एकरी लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, पिकांसाठी मोठ्या प्रमाणात खत व कीटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे अल्पावधीतच जमीन नापिक होते. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. जास्त पैसे मिळतात, या लालसेने आपली शेती परप्रांतीय शेतकऱ्यांना कसण्यासाठी देतात.
पिकांची लागवड केल्यानंतर परप्रांतीय शेतकरी तेलंगणा ते अहेरी तालुक्यात सतत ये-जा करतात. कोरोनामुळे जिल्हा व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. तरीही सदर शेतकरी तेलंगणा राज्यातून नदीमार्गे सातत्याने ये-जा करतात. विशेष म्हणजे, हे शेतकरी शेतमाल विक्रीसाठी तेलंगणा राज्यातील शहरांमध्ये जाऊन येतात. त्यामुळे या शेतकऱ्यांसोबतच कोरोनाची साथ अहेरी परिसरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
प्रतिबंधीत कीटकनाशकांचा वापर
परप्रांतीय शेतकरी प्रामुख्याने कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या ग्लायसील चोरबिटी या कापसाच्या बियाण्यांची लागवड करतात. मोठ्या प्रमाणात तण नाशकाचा वापर केला जाते. शेतकºयांच्या जमिनी अल्पावधीतच नापीक बनत चालल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या ट्रॅक्टरचाही रोजगार हिरावल्या गेला आहे.