सरपणासाठी जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:05 PM2018-07-16T23:05:47+5:302018-07-16T23:06:10+5:30
तालुक्यातील विसापूर खोर्दा-आमगाव मार्गावर पोर नदी आहे. पावसामुळे नदी दुथळी भरून वाहत आहे. तुडूंब भरलेल्या नदीपात्रातून लाकडे गोळा केले जात आहेत. यामुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील विसापूर खोर्दा-आमगाव मार्गावर पोर नदी आहे. पावसामुळे नदी दुथळी भरून वाहत आहे. तुडूंब भरलेल्या नदीपात्रातून लाकडे गोळा केले जात आहेत. यामुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नद्या जंगलातून वाहत येतात. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाण्याबरोबर उन्मळून पडलेली झाडे व लाकडे येतात. ही लाकडे गोळा करताना जीव गमावल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. गतवर्षी विसापूर व आमगाव येथील नागरिकांना लाकडे गोळा करताना जलसमाधी मिळाली होती. या बाबीची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शनिवारी रात्री दमदार पाऊस झाला. त्यामुळे पोर नदीच्या पाण्याची पातळी वाढून पाण्यासोबत लाकडेही येऊ लागली. विसापूर, खोर्दा, आमगाव येथील नागरिक रविवारी भर पावसात सरपण गोळा करीत होते. पुलावर राहून तर कधी नदीपात्रात उतरून लाकडे गोळा केली जातात. हे अतिशय धोकादाय काम आहे. कधीकधी नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक राहतो. नदीच्या अगदी मध्यभागी जाऊन सरपण गोळा करावे लागतात. एखादेवेळी लाकडासोबत सदर व्यक्ती सुद्धा वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या बाजूने नदी वाहते, त्या बाजूने लोकडे गोळा करण्याचे काम केले जाते. एखादेवेळी लाकडासोबत सदर व्यक्ती पुलाच्या आतमध्ये गेल्यास तो वाचून निघणे कठीण होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने लाकडे गोळा करणाऱ्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.
जिल्हाभरातील इतर नद्यांवरूनही अशा प्रकारे सरपण गोळा करण्याचे काम केले जाते. यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.