खड्ड्यामुळे संरक्षक भिंतीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:47+5:30
सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा अंतर्गत कढोलीजवळून वाहणाऱ्या सती नदीवरील पुलाच्या लगतचा भाग पावसाळ्यात वाहून गेला. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. पूल आणि संरक्षक भिंत यांच्यामधील पोकळी बुजविण्यासाठी नदीकाठावरची माती खोदून ती त्या पोकळीमध्ये टाकण्यात आली. खालची माती गेल्याने आता संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : पूल व संरक्षक भिंत यांच्यामध्ये पडलेली पोकळी बुजविण्यासाठी कंत्राटदाराने काठाच्या बाजूची नाली खोदून खड्डा तयार केला आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा अंतर्गत कढोलीजवळून वाहणाऱ्या सती नदीवरील पुलाच्या लगतचा भाग पावसाळ्यात वाहून गेला. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. पूल आणि संरक्षक भिंत यांच्यामधील पोकळी बुजविण्यासाठी नदीकाठावरची माती खोदून ती त्या पोकळीमध्ये टाकण्यात आली. खालची माती गेल्याने आता संरक्षक भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे. ज्या मातीवर संरक्षक भिंत उभी आहे, त्या ठिकाणी खड्डा पाडल्याने पुढे नदीच्या पाण्यामुळे उर्वरित मातीही वाहून जाणार आहे. त्यामुळे सदर संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे कंत्राटदाराने संरक्षक भिंतीच्या खालची माती उपसण्याची काहीच गरज नव्हती. पोकळीच्या ठिकाणी मुरूम टाकणे आवश्यक होते. मात्र थातुरमातूर काम उरकण्यासाठी त्याच ठिकाणची माती टाकली आहे. माती खोदल्यामुळे संरक्षक भिंतीला धोका पोहोचणार आहे. ही बाब सामान्य नागरिकाच्या लक्षात येते, तर अभियंत्यांना कसे समजत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुलाजवळची माती खोदल्याने भविष्यात पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
शिवकालीन बंधाऱ्याने केले पात्राचे नुकसान
कढोली पुलाच्या खालच्या भागातच शिवकालीन बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला. या बंधाऱ्याचा काहीच फायदा झाला नाही. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूला जवळपास २५ एकर नदीकाठाचा भूभाग वाहून गेला आहे. त्यामुळे नदीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा अशा पद्धतीने चुकीचे काम करीत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. बहुतांश ठिकाणचा नदीकाठ नदीबरोबर झाला आहे.
नदी हा अतिशय संवेदनशील विषय आहे. नदीतील रेतीचा जास्त प्रमाणात उपसा झाल्यास पर्यावरणाला धोका होऊ शकते. त्यामुळे नदीपात्राची पाहणी केल्याशिवाय घाट मंजूर केला जात नाही. कोणत्याही पुलाजवळ रेतीघाट मंजूर होत नाही. सरकारी यंत्रणा मात्र कोणताही विचार न करता कामे करून घेत आहे. नदीघाटावरील माती उपसणे हा अतिशय गंभीर प्रकार असून संबंधित कंत्राटदारावर किंवा अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.