मेणाच्या डोळ्यांमुळे बिघडले सौंदर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:12 AM2018-05-23T01:12:30+5:302018-05-23T01:12:30+5:30
शिल्पकलेचा अप्रतीम नमूना ठरावा, अशी मूर्ती वैरागड येथे आहे. मात्र काही वर्षांपूर्वी या मूर्तीला बाजारात विकत मिळणारे मेणाचे डोळे लावण्यात आले आहे. त्यामुळे या मूर्तीच्या सौंदर्यावर परिणाम झाला आहे.
प्रदीप बोडणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : शिल्पकलेचा अप्रतीम नमूना ठरावा, अशी मूर्ती वैरागड येथे आहे. मात्र काही वर्षांपूर्वी या मूर्तीला बाजारात विकत मिळणारे मेणाचे डोळे लावण्यात आले आहे. त्यामुळे या मूर्तीच्या सौंदर्यावर परिणाम झाला आहे.
आरमोरी तालुकास्थळापासून १५ अंतरावर वैरागड हे गाव आहे. या ठिकाणी ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वराचे मंदिर, इदगाह, गोरजाई मंदिर व हेमाडपंथी मंदिरे आहेत. ३० वर्षांपूर्वी वैरागड येथील सीताराम क्षिरसागर यांना त्यांच्या शेतात खोदकाम करताना पाच फूट उंचीची मूर्ती आढळून आली. एकाच दगडावर कोरलेल्या या सुंदर मूर्तीची माहिती तत्कालीन जिल्हाधिकारी गौतम यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी स्वत: वैरागडला येऊन मूर्ती वस्तू संग्रहालयात पाठविण्याची तयारी दर्शविली. मात्र गावातील नागरिकांनी विरोध करून त्याच ठिकाणी छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठास्थापना केली. आदीशक्ती असे नामकरण केले. तेव्हापासून स्थानिक नागरिक या मूर्तीला आदीशक्ती याच नावाने संबोधतात. पुरातत्त्व विभागाच्या मतानुसार सदर मूर्ती तारकेश्वरी देवीच्या मूर्तीप्रमाणे दिसत असल्याचा निष्कर्ष आहे.
मूर्तीच्या शेष भागात सुंदर नक्षीकाम काम केले आहे. मुकूट, कर्णकुंडल, मिटलेले ओट, अर्ध मिटलेले डोळे आणि गोलाकार भुवया यामुळे मूर्ती नम्रपणे पहात असल्याचा भास होतो. पण या मूर्तीला काही वर्षांपूर्वी मेणाचे डोळे लावण्यात आले. त्यामुळे मूर्तीचे स्वरूप एकदम आक्रमक स्वभावाप्रमाणे दिसते. मेणाच्या डोळ्यांमुळे मूर्तीचे मूळ स्वरूपच बदलले आहे. मूर्तीच्या वक्षस्थानापासून खालपर्यंत रेखीव माळ आहे. एका हातात डमरू, दुसऱ्या हातात त्रिशूल आहे. पायात चाळ घातल्या आहेत. एखाद्या सौंदर्यवती महिलेने अलंकार परिधान करावा, याप्रमाणे विविध अलंकाररूपी नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिरामुळे ऊन, वारा व पावसापासून मूर्तीचे रक्षण होत आहे. मात्र मूर्तीवर अभिषेक व पूजेचे साहित्य टाकले जात असल्यामुळे सौंदर्य नष्ट होत आहे. मूर्तीचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी भाविकांनीही अभिषेक करू नये.