दिना नदीच्या पाण्यातून धोकादायक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:26 AM2018-09-02T00:26:37+5:302018-09-02T00:27:04+5:30
दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : दिना नदीवर पूल नसल्याने अनेक नागरिक जीव धोक्यात घालून दिना नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढतात. पूल बांधण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष झाले आहे.
एटापल्ली तालुक्यातील बहुतांश नागरिक जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी रेगडी-देवदा या मार्गाचा वापर करतात. सदर मार्ग अतिशय सरळ आहे. त्यामुळे वेळ व पैसा दोन्हीचीही बचत होते. आलापल्ली मार्गाने गेल्यास १०० रूपये अधिक खर्च येतो व दोन तास उशीर सुध्दा होतो. वेळ व पैशाची बचत करण्यासाठी नागरिक रेगडी-देवदा मार्गे येतात. या मार्गावर दिना नदी आहे. या नदीवर पूल नाही. परिणामी नागरिकांना दिना नदीच्या पाण्यातूनच पुढे मार्गक्रमण करावे लागते. दिना नदीवर बांधलेल्या कन्नमवार जलाशय ओव्हरफ्लो होऊन वाहण्यास सुरूवात झाल्यानंतर या नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढते. मात्र पर्याय नसल्याने नागरिक नदीच्या पाण्यातून प्रवास करतात. कधीकाळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात
दिना नदीवरील हा पूल अत्यंत महत्त्वाचा असल्याने एटापल्ली व घोट परिसरातील नागरिकांकडून सदर पूल बांधण्याची मागणी वेळोवेळी केली जात होती. याची दखल घेऊन पुलाचे अंदाजपत्रक पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविण्यात आले आहे. पावसाळा झाल्यानंतर पुलाचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग चामोर्शीचे सहायक अभियंता नितीन हेडाऊ यांनी दिली आहे.
२००९-१० मध्ये पूल निर्मितीसाठी शासनाने अडीच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. हे काम चामोर्शी येथील एका कंपनीला देण्यात आले होते. मात्र नक्षल्यांनी पुलाच्या कामाला विरोध केला. त्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले.