पुलाअभावी धोकादायक प्रवास
By admin | Published: July 3, 2016 01:20 AM2016-07-03T01:20:41+5:302016-07-03T01:20:41+5:30
परिसरातील अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
मूलभूत सोयीसुविधांचा अभाव : लोकप्रतिनिधींचे १० वर्षांपासून दर्शन नाही
जिमलगट्टा : परिसरातील अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत धोकादायक प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देचलीपेठा परिसरात २० ते २५ गावे आहेत. पुलाअभावी या गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. परिसरातील एकाही गावात डांबरीकरण झाले नाही. कच्च्या रस्त्यामुळे चिखल निर्माण होतो. मागील महिनाभरापासून या परिसरात विजेचा लंपडाव सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला आहे. त्यामुळे किष्टापूर, कोतागुड्डम, पत्तीगाव, शेडा, सिंदा, दोंडगेर, जोगनगुड्डा, आसली, मुकनपल्ली, देचलीपेठा, येलाराम, कोंजेड, लोहा, कल्लेड, बिराडघाट, तोडसापल्ली, तोडका ही गावे अंधारात आहेत. विद्युत कर्मचारी वीज पुरवठा सुरू करण्यास असमर्थ ठरत आहेत.
जंगलांनी वेढलेली गावे असल्याने अनेक नदी, नाले आहेत. नदी, नाल्यांवर पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाण्यातून प्रवास करावा लागतो. या परिसरातील अनेक पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला येदरंगा येथील कापा इरपा कुळमेथ, मेंगा पोरीया कुळमेथे, गुजा मेंगा कुळमेथ यासह इतर दोन लाभार्थ्यांच्या घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र शेवटचा हप्ता अजुनपर्यंत प्राप्त झाला नाही. याबाबत लाभार्थ्यांनी चौकशी केली असता, पं.स. मध्ये फाईल नसल्याचे सांगण्यात आले. मागील दहा वर्षांपासून या परिसरात आमदारांचे दर्शन झाले नाही. रस्ते, वीजे सारखे मूलभूत प्रश्न अजुनही कायम आहे.