‘डान्स हंगामा’नेच केले झाडीपट्टीला कलंकित

By admin | Published: May 19, 2017 12:14 AM2017-05-19T00:14:18+5:302017-05-19T00:14:18+5:30

दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा लाभलेल्या झाडीपट्टीला व येथील कलावंतांना दर्जेदार नाट्यप्रयोगांमुळे सुगीचे दिवस प्राप्त झाले होते.

Dangerous tree truncheon made with 'Dance Season' | ‘डान्स हंगामा’नेच केले झाडीपट्टीला कलंकित

‘डान्स हंगामा’नेच केले झाडीपट्टीला कलंकित

Next

अधिक पैसे कमावण्याचा नाद कारणीभूत : मुलीच्या फसवणूक प्रकरणावरून सिद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा लाभलेल्या झाडीपट्टीला व येथील कलावंतांना दर्जेदार नाट्यप्रयोगांमुळे सुगीचे दिवस प्राप्त झाले होते. हळूहळू कलावंतांच्या मानधनातही मोठी वाढ झाली. मात्र यानंतरही अल्पावधीत अमाप पैसा कमविण्याच्या नादात नाट्यप्रयोगापूर्वी ‘डान्स हंगामा’ ही संकल्पना अस्तित्वात आणली आणि येथेच घात झाला. त्यातूनच पैशाच्या हव्यासापायी तमाशाच्या फडात मुलींना नेऊन त्यांची विक्री करण्याचा प्रकार घडल्याने झाडीपट्टी रंगभूमी कलंकित झाली आहे.

डान्स हंगामाच्या माध्यमातून डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मुलींना नाचविण्याचे काम सुरू झाले. पैशाच्या आमिषाला बळी पडून अनेक नवख्या मुलींचा शिरकाव डान्स हंगामा ग्रुपमध्ये झाला. त्यांच्या या कमजोरीचा फायदा घेऊन अश्लिल नृत्य सादर करण्यास संचालक भाग पाडू लागले. त्यामुळे कमी वेळात अधिक पैसे कमविण्याच्या नादात डान्स हंगामाच्या चक्रव्युहात सापडलेल्या मुलींची फसवणूक झाली.
देसाईगंज हे झाडीपट्टी रंगभूमीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. झाडीपट्टीत समाविष्ट असलेल्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्याबाहेरही झाडीपट्टीच्या नाट्यप्रयोगांचा प्रचार व प्रसार होऊ लागला. दरम्यान झाडीपट्टी रंगभूमित अनेक नव्या नाट्य कंपन्यांना नाट्यप्रयोग सादरीकरणाची संधी मिळणे कठीण झाले. यावर मात करण्यासाठी अनेक नव्या नाट्य कंपन्यांच्या संचालकांनी डान्स हंगामासह कमी रकमेत नाट्यप्रयोग उपलब्ध करून घेणे सुरू केले.
अशा कंपन्यांचा झाडीपट्टीत बोलबाला सुरू होऊन अश्लिलतेची आवड असलेले आंबटशौकिन रसिक नव्या कंपन्यांच्या नाट्यप्रयोगांकडे वळले.
दरम्यान डान्स हंगामात मद्यधुंद अवस्थेतही मुली थिरकू लागल्या. येथूनच झाडीपट्टी रंगभूमीला कलंक लागण्यास प्रारंभ झाला. परिणामी झाडीपट्टीत कधी नव्हे ते गेल्या दोन-चार वर्षात जीव घेण्याच्या घटना घडल्या. काहींचे संसारही पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत.

असा झाला मुलींचा तमाशा फडात शिरकाव
देसाईगंज येथील ज्या महिलेने स्थानिक मुलींना सोलापूरच्या तमाशापर्यंत पोहोचविले ती पुण्याकडील तमाशा फडातूनच नाट्य कलावंत म्हणून उदयास आली. झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्य प्रयोगांचा हंगाम संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागात तमाशाचे फड सुरू होतात, याची पूर्ण जाणीव त्या महिलेला होती.
नाट्यप्रयोगांचा हंगाम संपल्यानंतर डान्स हंगामात नाचणाऱ्या मुली रिकाम्या असतात व त्यांना या काळातही पैसा हवा असतो, नेमकी हिच गोष्ट हेरून पुण्याकडील तमाशा फडाच्या संचालकांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर झाडीपट्टीतील अनेक मुलींना सोबत घेऊन ती महिला तमाशा फडात जाऊ लागली.
मागील चार-पाच वर्षांपासून जवळपास ३० ते ४० मुली तिकडच्या भागात जाऊन मोठ्या रक्कमा कमावून इकडे परतू लागल्या. त्यानंतर हीच बाब हेरून यावर्षी झाडीपट्टीतील नामवंत नृत्यांगणाही तमाशा फडाच्या वारीवर गेल्या होत्या. मात्र तमाशा फडाच्या खऱ्या कसोटीला येथील मुली उतरू न शकल्याने तमाशा फडाच्या संचालकांशी वाद उफाळून आला. त्यानंतर काही मुली तमाशा फडातून परत आल्या. मात्र काहींच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना पैसे कमविण्याच्या नादात तिकडेच थांबण्यास भाग पाडले.

गांभीर्याने चौकशी करणे गरजेचे
तमाशा फडात नेमक्या किती मुली थिरकल्यात हे सांगणे अद्यापही कठीण आहे. पुणेकडील भागात तमाशाच्या फडात काम करते म्हणून झाडीपट्टीतील किती मुली गेल्या, त्या कोणाच्या माध्यमातून गेल्या, या बाबतच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यात आहे. सदर प्रकरणाची गांभीर्याने सखोल चौकशी केल्यास सत्य उजेडात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र तमाशा फडात गेलेल्या मुलींंसोबत घडलेल्या प्रकारामुळे झाडीपट्टी रंगभूमी पुरती हादरली आहे, हे मात्र खरे.

 

Web Title: Dangerous tree truncheon made with 'Dance Season'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.