कन्नमवार नगरातील धोकादायक अनधिकृत टॉवर कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:25 AM2021-06-17T04:25:29+5:302021-06-17T04:25:29+5:30

गडचिरोली : स्थानिक नगरपालिकेच्या हद्दीतील कन्नमवार नगर वॉर्ड क्र. १७ मध्ये रिलायन्स टॉवर आहे. मात्र या टॉवरच्या सभोवताली प्रचंड ...

Dangerous unauthorized tower in Kannamwar town forever | कन्नमवार नगरातील धोकादायक अनधिकृत टॉवर कायमच

कन्नमवार नगरातील धोकादायक अनधिकृत टॉवर कायमच

Next

गडचिरोली : स्थानिक नगरपालिकेच्या हद्दीतील कन्नमवार नगर वॉर्ड क्र. १७ मध्ये रिलायन्स टॉवर आहे. मात्र या टॉवरच्या सभोवताली प्रचंड पाणीसाठा असून, दलदल आहे. या ठिकाणी बाराही महिने पाणी साचून राहते. त्यामुळे सदर टॉवर हा कधीही कोसळून हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या टाॅवरला पालिका प्रशासनाची रितसर परवानगी नाही. नागरिकांच्या तक्रारीवरून पालिका प्रशासनाने गेल्या दाेन वर्षात या टाॅवरसंदर्भात टेलिकाॅम विभागाला तीनदा नाेटीस बजावली आहे.

सदर धाेकादायक टाॅवर खासगी जागेत असला तरी ताे अनधिकृत आहे. शिवाय पाणीसाठा व दलदलीच्या भागात हा टाॅवर असल्याने पावसाळ्यात लगतच्या घरावर काेसळू शकताे. नगर परिषद प्रशासनाने टेलिकाॅम विभागाचे मार्गदर्शन मागितले आहे. सदर टाॅवर पाडायचा की सील करायचा, याबाबत टेलिकाॅम विभागाने न.प.ला काहीही कळविलेले नाही. परिणामी पालिका प्रशासनाने सध्यातरी प्रतीक्षेच्या भूमिकेत आहे.

कन्नमवार नगरात रिलायन्स कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरलगत वेगवेगळे दोन ले-आउट आहेत. या ले-आउटलगत ओपन स्पेस असून, आजूबाजूला घरांची वस्ती आहे. कन्नमवार नगराच्या घरातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी याच टॉवर खालून जात असते. रिलायन्स पेट्रोलपंपापासून मोठी नाली बांधून ती अलीकडच्या मार्गाच्या मोठ्या नालीला जोडणे आवश्यक आहे. रिलायन्स कंपनीच्या टॉवरजवळ पाइप टाकून भूमिगत नाली करता येणे शक्य आहे. टॉवरजवळून भूमिगत नाली करून लगतचे ओपन स्पेस विकसित केल्यास या भागात घाणीचे साम्राज्य राहणार नाही. सदर टॉवर हटवून येथील ओपन स्पेसला विकसित करून त्याचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिक करीत आहेत. मात्र या मागणीकडेसुद्धा पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सदर टाॅवरबाबतची ही समस्या नागरिकांनी मागील पावसाळ्यापूर्वी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्याकडे मांडली हाेती. मात्र प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झाली नाही.

बाॅक्स

टॉवर हटवून लोकवस्तीच्या बाहेर नेण्याची मागणी

कन्नमवार नगर वॉर्ड क्र. १७ येथे धोकादायक रिलायन्स टॉवर आहे. सदर टॉवरच्या सभोवताली पाणीसाठा आहे. त्यामुळे टॉवरचे खांब कमजोर होऊन तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर टॉवर हा येथून कायमचा हटवून लोकवस्तीच्या बाहेर हलविण्यात यावा, अशी मागणी कन्नमवार नगरातील नागरिकांनी केली आहे.

डुकरांचा हैदोस व डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त

सदर टॉवरच्या परिसरात घाण पाण्याचे डबके तयार झाले असून, येथे कचरा वाढला आहे. या ठिकाणी डुकरांचा हैदोस राहत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नजीक घरे असलेल्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे. कन्नमवार नगरात शिक्षक निशाने यांच्या घरासमोर चांगल्या पद्धतीचे ओपन स्पेस तयार झाले आहे. मात्र या ओपन स्पेसच्या भागात टॉवर असलेल्या या भागातून पावसाळ्यात पाण्याचा मोठा लोंढा येतो. त्यामुळे टॉवर असलेल्या परिसराची स्वच्छता करून सदर टॉवर दुसरीकडे हलविणे आवश्यक आहे.

Web Title: Dangerous unauthorized tower in Kannamwar town forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.