मार्कंडेश्वरात दर्शनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:36+5:302021-03-14T04:32:36+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा देवस्थान अखेर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मार्कंडेश्वराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने तहसील ...
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा देवस्थान अखेर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मार्कंडेश्वराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने तहसील कार्यालय किंवा मार्कंडा देवस्थान मार्गावरील पोलीस चौकीत आपल्या नावाची नोंदणी करून दर्शनासाठी आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन आ.डॉ. होळी यांनी भाविकांना केले आहे.
दर्शनासाठी गडचिरोली जिल्ह्यातूनच नव्हे, तर विदर्भाच्या अनेक भागांतून भाविक महाशिवरात्रीला येत असतात. परंतु, यावर्षी प्रशासनाने दर्शनासाठी बंदी घातल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आ. डॉ. होळी यांनी राज्य शासन व प्रशासनाचा निषेध करीत आंदोलनाचा इशारा दिला होता, त्याचा सकारात्मक परिणाम होऊन प्रशासनाच्या वतीने मंदिर शनिवारी सकाळपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्या अनुषंगाने डॉ. होळी यांनी देवस्थानात प्रथम पूजन करून दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, भाजप तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, ज्येष्ठ नेते जयराम चलाख व कार्यकर्ते उपस्थित होते.