डेकोरेशन, मंडप व्यावसायिकांना उत्सवाने आणले अच्छे दिन
By admin | Published: September 11, 2016 01:29 AM2016-09-11T01:29:41+5:302016-09-11T01:29:41+5:30
गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव हे आता लागूनच असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात डेकोरेशन व मंडप
शेकडो हातांना काम उपलब्ध : रात्रंदिवस एक करून उभारले जात आहेत शामियाने
गडचिरोली : गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव हे आता लागूनच असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात डेकोरेशन व मंडप व्यावसायिकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात काम वाढून गेले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात ६८५ सार्वजनिक गणेश मंडळ असून जवळजवळ १२ हजारावर अधिक घरगुती गणपती आहे. जवळजवळ एवढेच दुर्गा व शारदा मंडळही असून यांच्याकडून उत्सव साजरे केले जातात. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी येथील दुर्गा उत्सव विदर्भाच्या विविध भागात प्रसिध्द आहे. या उत्सवासाठी मोठे देखावेही तयार केले जातात. गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात दसरा हा सणही उत्सवात साजरा केला जातो. या सर्व सणासुदीमुळे सध्या गडचिरोलीसह शहरी व ग्रामीण भागातील मंडप व डेकोरेशन व्यावसायिकांकडे प्रचंड काम वाढले आहे. जवळजवळ १० हजारावर अधिक मजुरांना मंडप बांधणीचे काम उपलब्ध झाले आहे. याशिवाय ज्येष्ठ गौरी, गणपती यांचेही काम कॅटरिंग व्यावसायिकांना मिळत असून अनेक कॅटरिंग व्यावसायिकांनी मंडप डेकोरेशनचेही काम सुरू केले आहे. त्यामुळे २४ तास राबणारे शेकडो हात या कामात गुंतलेले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून घरोघरी भोजनावळींना कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरूवात होऊन जाते. गणेशोत्सवाच्या काळात अनेक सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप व डेकोरेशन उभारणीचे काम आमच्याकडे येत असते. त्यामुळे या सर्वांना साहित्य पुरविण्यासोबतच सेवा द्यावी लागते. दिवाळीपर्यंत आता मंडप व डेकोरेशनचा व्यवसाय तेजीत राहणार आहे.
- मुखरूजी आभारे, गडचिरोली