स्वच्छता कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:37 AM2019-01-21T00:37:18+5:302019-01-21T00:37:44+5:30
येथील ग्रामीण रूग्णालयात कर्तव्यावर असताना रूग्णाच्या नातेवाईकांसोबत बाचाबाची झाली असता त्याचा वचपा काढण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णालयातील स्वच्छता कर्मचाºयावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : येथील ग्रामीण रूग्णालयात कर्तव्यावर असताना रूग्णाच्या नातेवाईकांसोबत बाचाबाची झाली असता त्याचा वचपा काढण्यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपी शपू पठाण याला देसाईगंज पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातून २० जानेवारीला सायंकाळी अटक केली.
मुरलीधर राधेश्याम दिवटे(स्वच्छता सेवक) असे हल्ला झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. वैद्यकीय अधिकारी हे रूग्णांना तपासण्यासाठी येणार असल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना वार्डातून बाहेर निघण्याची विनंती दिवटे यांनी शनिवारी सकाळच्या सुमारास केली होती. यावरूनच रूग्णाच्या नातेवाईकांसोबत शाब्दिक चकमक उडाली. दिवटे हे कर्तव्य बजावून घराकडे परत जात असताना लाखांदूर टी पार्इंटवर रूग्णाच्या नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दिवटे गंभीर जखमी झाले. त्यांना ब्रह्मपुरी येथील रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
या घटनेचा ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध करीत कामबंद २० जानेवारी रोजी कामबंद आंदोलन केले. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आरोग्य कर्मचाºयांनी व्यक्त केला. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे.