अवघ्या चार दिवसात दुसऱ्या हत्तीचा मृत्यू; कमलापूर हत्ती कॅम्पवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 11:14 AM2021-08-07T11:14:52+5:302021-08-07T11:15:55+5:30
Gadchiroli News नैसर्गिक वातावरणात सर्वाधिक हत्तींचे वास्तव्य असणारे ठिकाण म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नैसर्गिक वातावरणात सर्वाधिक हत्तींचे वास्तव्य असणारे ठिकाण म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू झाला. दीड वर्षे वयाचा ‘अर्जुन’ शुक्रवारी दुपारी हत्ती कॅम्पपासून काही अंतरावर मृतावस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे मंगळवारी (दि. ३) ‘सई’ या तीन वर्षे वयाच्या हत्तिणीचा अशाच पद्धतीने अचानक मृत्यू झाला होता.
अवघ्या चार दिवसांत दोन हत्तींच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याने कॅम्पमधील हत्तींच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वन्यजीव प्रेमींसह नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
नक्षलग्रस्त भाग असतानाही अनेक हौशी पर्यटक कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये सहपरिवार येऊन नैसर्गिक वातावरणासह कॅम्प परिसरात फिरणाऱ्या हत्तींना पाहण्याचा, त्यांना चारा खाऊ घालण्याचा आनंद लुटतात. या कॅम्पमध्ये गेल्या वर्षीपर्यंत लहान-मोठे १० हत्ती होते. २९ जून २०२० रोजी आदित्य या ४ वर्षांच्या पिलाचा कॅम्पमधील वनकर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला होता. आता सई आणि पाठोपाठ अर्जुनचा मृत्यू झाल्यामुळे या कॅम्पमधील हत्तींची संख्या सातवर आली आहे.
पशुसंवर्धन अधिकारीच नाही
कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये एवढ्या संख्येने असलेले हत्ती हे वनविभागासाठी वैभव आहे; पण त्यांच्या देखभालीसाठी या विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. हत्तींची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारीही नाही. त्यामुळे कोणता हत्ती आजारी आहे किंवा कोणाला उपचाराची गरज आहे, हेसुद्धा कळत नाही. सिरोंचा वनविभागांतर्गत येणाऱ्या या कॅम्पमधील हत्तींच्या अकाली मृत्यूंची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.