मातेच्या पोटातच बाळाचा मृत्यू
By admin | Published: May 18, 2016 01:38 AM2016-05-18T01:38:54+5:302016-05-18T01:38:54+5:30
प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात ४ एप्रिल रोजी भरती झालेल्या अहेरी येथील रंजिता संतोष दोंतुलवार या महिलेची ४२ दिवस उलटूनही सिजर करण्यात आले नाही.
४३ दिवस रूग्णालयात भरती : दोषींवर कारवाईची छाया कुंभारे यांची मागणी; चौकशी समिती नेमली
गडचिरोली : प्रसूतीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात ४ एप्रिल रोजी भरती झालेल्या अहेरी येथील रंजिता संतोष दोंतुलवार या महिलेची ४२ दिवस उलटूनही सिजर करण्यात आले नाही. त्यामुळे बालकाचा सोमवारी रात्री १०.३० वाजता पोटातच मृत्यू झाला व मातेची तब्येतही गंभीर आहे. यासाठी जबाबदार असलेल्या डॉ. किलनाके यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जि.प. सदस्य छाया कुंभारे यांनी केली आहे.
रंजिता संतोष दोंतुलवार ही ३२ वर्षीय महिला जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रसूतीसाठी भरती होती. मात्र ४२ दिवस उलटूनही तिच्यावर उपचार करण्यात आले नाही. सिजर करण्यासाठी तिला सतत तीन दिवस उपाशी ठेवण्यात आले. मात्र सिजर केले नाही. डॉ. किलनाके यांनी रंजिताची सोमवारी रात्री १०.३० वाजता तपासणी केली व बाळ पोटातच मृत्यू पावल्याचे घोषीत केले. त्याचवेळी रंजिताची बीपी वाढल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जि.प. सदस्य छाया कुंभारे यांनी मंगळवारी दुपारी ११ वाजता रूग्णालयाला भेट दिली. रंजिताच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्याकडे केली. डॉ. रूडे यांनी डॉ. दीपचंद सोयाम, डॉ. शेंद्रे व डॉ. मेश्राम यांचा सहभाग असलेल्या चौकशी समितीच्या मार्फतीने चौकशी केली जाईल. ही समिती दोन दिवसात आपला अहवाल सादर करेल व सदर अहवाल कारवाईसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविला जाईल, असे आश्वासन दिले. (नगर प्रतिनिधी)