अन् मृत बालकाला त्यांनी मध्यरात्री स्वत:च्या गाडीने पोहोचविले गावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:01:12+5:30
लाहेरीजवळील बेंगरी गावातील राजू चूक्कु पुंगाटी हा बालक उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मलेरियाने मरण पावला. सदर आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कुटुंबियांजवळ मृत बालकाला गावी घेऊन कसे जायचे असा यक्षप्रश्न निर्माण झाला. दु:खाचा डोंगर त्यांच्यासमोर होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : लॉकडाऊनच्या या काळात सर्वच व्यवहार बंद असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात मलेरियाने मरण पावलेल्या एका बालकाच्या कुटुंबियांवरही बाका प्रसंग उद्भवला होता. पण येथील धर्मराव कृषी विद्यालयातील लिपिक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय झलिकरवार यांनी पुढाकार घेत स्वत:च्या गाडीने त्या बालकाचा मृतदेह भामरागड तालुक्यातील बेंगरी येथे पोहोचविला. एवढेच नाही तर त्या गरीब कुटुंबाला बालकाच्या अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदतही दिली.
लाहेरीजवळील बेंगरी गावातील राजू चूक्कु पुंगाटी हा बालक उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मलेरियाने मरण पावला. सदर आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच, त्यात संचारबंदी व लॉकडाऊनमुळे कुटुंबियांजवळ मृत बालकाला गावी घेऊन कसे जायचे असा यक्षप्रश्न निर्माण झाला. दु:खाचा डोंगर त्यांच्यासमोर होता. ही बाब संजय झलिकरवार यांना समजताच त्यांनी तात्काळ अहेरीच्या उपजिल्हा रु ग्णालयात धाव घेऊन मध्यरात्री २ वाजता कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता भामरागडसारख्या अतिदुर्गम लाहेरीजवळील बेंगरी गावात बालकाचा मृतदेह व मृतकाच्या कुटुंबियांना स्वत:च्या गाडीने सुखरूप पोहचविले.
झलिकरवार यांच्या रूपाने साक्षात ईश्वरानेच आपल्याला मदत केल्याची प्रतिक्रि या मृतकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.