शेतातील खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू
By admin | Published: November 10, 2014 10:44 PM2014-11-10T22:44:17+5:302014-11-10T22:44:17+5:30
आष्टी- इल्लूर मार्गावर राहत असल्याने श्वेता चांगदेव बोरकर या दहा वर्षीय मुलीचा शेतातील खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
आष्टी : आष्टी- इल्लूर मार्गावर राहत असल्याने श्वेता चांगदेव बोरकर या दहा वर्षीय मुलीचा शेतातील खड्ड्यात पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
श्वेता बोरकर ही सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घरालगत असलेल्या शेतात शौचास गेली. सदर शेतात जेसीबीने काही दिवसांपूर्वीच मोठा खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात श्वेताचा पाय घसरल्याने तिचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. श्वेता सायंकाळ होऊनही घराकडे परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरू केले असता तिचा मृतदेह खड्ड्यात पडला असल्याचे आढळून आले. सायंकाळी ६ वाजता मृतदेह खड्ड्यातुन काढण्यात आला. घटनेच्या दिवशी तिचे आईवडील दोघेही बाहेरगावी तेरवीच्या कार्यक्रमाला गेले होते. घरी तिघी बहीणी होत्या. बहिणींनी तिचा शोध घेणे सुरू केले. मयत श्वेता ही सर्वात लहान बहिन असून ती जिल्हा परिषद शाळा इल्लूर येथे चवथ्या वर्गात शिकत होती. तिचे वडील पेपर मिलमध्ये रोजंदारी कामावर आहेत. श्वेताच्या अचानक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्वेताच्या वडीलांची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. शेतात जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदण्यात आला आहे.
या खड्ड्याला परवानगी सदर शेतमालकाने घेतली होती काय? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्वेताच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)